नागपूर : महापालिकेने फुटाळा तलावाच्या पाणलोट क्षेत्रातील अतिक्रमणाला गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे एका कौलारू झोपडीचे पक्के घर झाले आणि पुढे त्यातूनच व्यवसायासाठी लॉन विकसित झालेे, असा आरोप शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. अतिक्रमणकर्त्यांविरुद्ध दोन गुन्हे दाखल झाले तरी वीज आणि पाणीपुरवठा खंडित झाला नाही, याकडेही लक्ष वेधले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिकेने २०१९ ला लॉन बंद करून बांधकाम पाडण्याबाबतचे पत्र माजी नगरसेवक कमलेश चौधरी यांना पाठवले होते. पण, याला कोणताही कायदेशीर आधार नव्हता. त्यामुळे कमलेश चौधरी यांनी ते पत्र गांभीर्याने घेतले नाही. महाराष्ट्र एमआरटीपी ॲक्टनुसार नोटीस बजावण्यात आली नाही. अन्यथा कमलेश चौधरी यांना महापालिका निवडणूक लढता येणे शक्य झाले नसते. तसेच अतिक्रमण वाढू शकले नसते, असे उपलब्ध कायदापत्रावरून दिसून येते.

सामाजिक कार्यकर्ता ज्वाला धोटे यांनी हे प्रकरण लावून धरले. त्यानंतर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने लॉनसाठी फुटाळा तलावातील पाणलोट क्षेत्रात अतिक्रमण झाल्याचे महापालिकेला ४ जून २०२१ रोजी कळवले. महापालिकेने २५ ऑगस्ट २०२२ एमआरटीपी ॲक्टनुसार नोटीस बजावून फौजदार गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला. नंतर या प्रकरणात २०२२ आणि २०२५ मध्ये दोन गुन्हे दाखल झाले.

अतिक्रमणकर्त्यावर कृपादृष्टी का? – ज्वाला धोटे

कृषी विद्यापीठ विदर्भात व्हावे यासाठी दिवंगत विदर्भवीर जांबुवंतराव थोटे यांनी आंदोलन केले होते. कृषी विद्यापीठाचे हे तलाव होते. आता ते महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या ताब्यात आहे. या ऐतिहासिक तलावात अतिक्रमण होऊ नये म्हणून वारंवार तक्रार केली. परंतु महापालिका प्रशासनाने त्याकडे डोळेझाक केली. त्यामुळे माजी नगरसेवक कलमेश चौधरी यांची तलावाच्या आठ एकरमध्ये अतिक्रमण करून दोन बंगले आणि लॉन विकसित केले. किरकोळ अतिक्रमण लगेच हटवणारी महापालिका लॉनमधून लाखो रुपये कमावणाऱ्यांवर कृपादृष्टी का ठेवत आहे, असा सवाल ज्वाला धोटे यांनी उपस्थित केला.

अनेक नेत्यांकडून अतिक्रमण – सौरभ दुबे

महाराष्ट्र प्राणी, मत्स्य विज्ञान विद्यापीठ आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी वीज वितरण कंपनीला पत्र लिहून फुटाळा तलाव आणि त्याच्या पाणलोट भागात माजी नगरसेवक कमलेश चौधरी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बांधलेले अवैध घर आणि लॉनचा वीजपुरवठा बंद करण्याची मागणी करावी. अशा अनेक फुटकळ नेत्यांनी शहरात अतिक्रमण केले आहे. त्यांच्यावरही कारवाई व्हावी, अशी मागणी ॲड. सौरभ दुबे यांनी केली.