नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामधील आरोपप्रत्यारोप महाराष्ट्राने अनुभवला आहे. आता पुन्हा एकदा अनिल देशमुख यांनी गुड गव्हर्नन्स अहवालाच्या आधारे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्य केले आहे. राज्यातील गुन्हेगारी रोखण्यात गृह खाते अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली आहे.

राज्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. खून, अपहरण, दरोडा, अत्याचार यासारखे गंभीर गुन्ह्यात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. नुकतेच गुड गव्हर्नन्स अहवाल प्रकाशित झाले आहे. यात महाराष्ट्रातील ३६ पैकी ३२ जिल्ह्यात गुन्हेगारी रोखण्यासाठी गृहविभाग अपयशी ठरला, असा ठपका ठेवण्यात आला आहे. यामुळे राज्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी गृहविभाग हा सपशेल अपयशी ठरला आहे, अशी टीका अनिल देशमुख यांनी फडणवीस यांच्यावर केली आहे.

हेही वाचा : खासगी प्रवासी वाहतुकीतून बेईमानी… सार्वजनिक प्रवासी वाहतूक…

या अहवालात १० क्षेत्रातील सरकारच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. त्यापैकी न्याय व लोकसुरक्षा (गुन्हेगारी) तसेच सामाजिक विकास या दोन क्षेत्रात सर्वच जिल्हे पिछाडीवर आहेत. एकीकडे ढासळलेले सामाजिक संतूलन आणि त्यातूनच वाढलेल्या गुन्हेगारीचा मुद्दा या अहवालातून प्रकर्षाने पुढे आला,असा दावा देशमुख यांनी केला आहे.

सामाजिक विकासात राज्यातील केवळ तीन जिल्हांना ५० टक्यापेक्षा जास्त गुण आहे. उर्वरित ३३ जिल्हे हे सामाजिक विकासात अनुत्तीर्ण झाले आहेत. या गंभीर बाबीकडे राज्यातील गृहविभागाने वेळीच लक्ष देण्याची गजर असल्याचे अनिल देशमुख यांचे मत आहे.

हेही वाचा : वाघाच्या बछड्याच्या मृत्यूचे खरे कारण आले समोर, गोंदिया वन विभागाच्या…

न्याय व लोक सुरक्षा या क्षेत्राबाबतही या अहवालातून अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. लोक सुरक्षा क्षेत्रात महिलांवरील अत्याचार, बालकांवरील अत्याचार, गुन्हांचा छडा लागण्याचे प्रमाण आदी गंभीर बाबीचा आढावा घेण्यात येतो. या न्याय व लोकसुरक्षा या क्षेत्रात राज्यातील केवळ चार जिल्हांनाच ५० टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळाले आहे. बाकीच्या ३२ जिल्ह्यात न्याय व लोकसुरकक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यातील यवतमाळ, वाशीम, जळगाव, लातुर, धुळे, सोलापूर, सांगली, पुणे, धाराशिव, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर या १४ जिल्हांना ४० टक्क्यापेक्षा कमी गुण मिळाले असून सर्वत्र चर्चेत असलेल्या बीड जिल्हा, तसेच नाशिक व जालना या तीन जिल्हांना लोकसुरक्षेच्या क्षेत्रात ३० गुणही नाहीत. गुड गव्हर्नन्स अहवालाचा विचार केला तर राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे, असा आरोप देशमुख यांनी प्रसिद्ध पत्रकातून केला आहे.

Story img Loader