Anil Deshmukh Injured in Stone Pelting : माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्या वाहनावर सोमवारी रात्री अज्ञात इसमांनी दगडफेक केली. त्यात देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांना काटोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. नरखेड येथून प्रचारसभा आटोपून काटोलकडे परत जात असताना बेला फाट्यानजिक ही घटना घडली.
काटोल मतदार संघात अनिल देशमुख यांचे पूत्र सलील हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. प्रचाराच्या अखरेच्या दिवशी देशमुख दिवसभर मतदार संघात प्रचारात सक्रीय होते. संध्याकाळी त्यांची नरखेडमध्ये सभा होती. ती आटोपून कार्यकर्त्यांसमवेत ते कारने काटोलकडे निघाले होते. या दरम्यान बेला फाट्याजवळ काही अज्ञात इसमांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. यात अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले असून त्यांना काटोलच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. या घटनेची चित्रफित समाजमाध्यमावर प्रसारित झाली असून त्यात देशमुख यांच्या चेहऱ्यावर जखमा दिसून येत आहेत. त्याच प्रमाणे त्यांच्या वाहनाच्या काचा फुटलेल्या दिसून येतात. या संदर्भात नागपूर ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी घटना घडल्याचे सांगितले. परंतु, अन्य तपशील देण्यास नकार दिला. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते रुग्णालयाजवळ एकत्र झाले होते. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. भाजपने ही ‘स्टंटबाजी’ आहे, असा आरोप केला आहे. स्वत:च्याच कार्यकर्त्यांकडून देशमुख यांनी दगडफेक घडवून आणली, असा आरोप भाजपचे काटोल मतदार संघाचे प्रभारी अविनाश ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.
हेही वाचा : Maharashtra Assembly Election 2024 : मतदान होण्यापूर्वीच जिल्हाधिकारी शाईचे बोट का दाखवितात?
u
काटोलमध्ये सलील देशमुख यांच्याविरुद्ध भाजपचे चरणसिंह ठाकूर यांच्यात अटीतटीची लढत आहे. मतदानाच्या दोन दिवसांपूर्वी ही घटना घडल्याने राजकीय वर्तूळात खळबळ उडाली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात वाद मागील काही वर्षांपासून सुरु आहे. देशमुख मंत्री असताना त्यांच्यावर झालेले खंडणीचे आरोपाला भाजपची फूस होती, असा आरोप देशमुख यांनी यापूर्वीच केला आहे. या संपूर्ण घटनाक्रमावर त्यांनी एक पुस्तकही काढले आहे. अलीकडे या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या न्या. चांदीवाल यांनी एका मुलाखतीत खंडणी प्रकरणात कोणालाही ‘क्लिन चीट’ दिली नाही, असा दावा केला होता. त्याचा आधार घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काटोल मतदार संघातील प्रचारसभेत देशमुखांचे पितळ उघडे पडले, अशी टीका केली होती. ही पार्श्वभूमी लक्षात घेता मतदानापूर्वीच्या घटनेला महत्व आले आहे.