नागपूर : इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घरात सिलिंडरचा भडका उडून अचानक स्फोट झाला. या स्फोटात पती-पत्नीसह दोन मुले गंभीर जखमी झाली. जखमींना मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. चौघापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती इमामवाडा पोलिसांनी दिली. ही घटना बुधवारी रात्री साडेसात वाजता घडली. सिलिंडरच्या स्फोटामुळे मोठा आवाज आल्याने शेजाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यांनी लगेच घटनास्थळाकडे धाव घेतली. सुरेंद्र पाल, रमा पाल अशी गंभीर जखमी झालेल्या पती-पत्नीची नावे आहेत. तर दोन्ही मुले किरकोळ जखमी असल्याची माहिती आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्र पाल हे पत्नी, मुलगी (११ वर्षे) आणि मुलगा (१३ वर्षे) यांंच्यासोबत इमामवाड्यातील आयोसोलेशन रुग्णालयाजवळ राहतात. बुधवारी सायंकाळी घरात पत्नी स्वयंपाक बनवत असताना अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. त्यावेळी स्वयंपाक घरात सुरेंद्र पाल आणि मुले जेवण करीत होते. स्फोटामुळे स्वयंपाक घरात आगीचा मोठा भडका उडाला.

हेही वाचा : जनतेला हक्क देणारे आंबेडकर लोकांसाठी देवच, शाहांच्या वक्तव्यानंतर आदित्य ठाकरेंची आमदारांसह दीक्षाभूमीला भेट

या स्फोटात पती-पत्नीसह दोन्ही मुले जखमी झाले. पती-पत्नी गंभीररित्या भाजल्या गेली तर दोन्ही मुले किरकोळ जखमी झाले. चारही जखमींना मेडिकल रुग्णालयाच्या वार्ड क्रमांक ४ मध्ये दाखल करण्यात आले. या प्रकरणाची नोंद इमामवाडा पोलिसांनी घेतली असून सिलिंडरच्या स्फोटाचे कारण अद्याप माहिती झाले नाही. या स्फोटातील चारही जखमींवर उपचार सुरु असून चौघांचीही प्रकृती ठिक आहे, पुढील चौकशी करीत आहोत, अशी प्रतिक्रिया इमामवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश ताले यांनी दिली.

Story img Loader