नागपूर : नरखेड तालुक्यातील मोवाड गावातील एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केली. पती- पत्नी आणि दोन्ही मुलांचा समावेश आहे. ही हृदयदायक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. विजय मधुकर पाचोरी (६८), माला विजय पचोरी (५५), गणेश विजय पचोरी (३८) आणि दीपक विजय पचोरी (३६) अशी आत्महत्या केलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, विजय पाचोरी हे सेवानिवृत्त शिक्षक असून पत्नी माला आणि दोन्ही मुले गणेश आणि दीपक यांच्यासोबत राहत होते. विजय यांनी एक सोसायटी उघडली होती. त्यामध्ये अनेकांनी पैसे गुंतवले होते. मात्र, ती सोसायटी बुडाली. अनेकांनी पैशासाठी तगादा लावला. या संदर्भात काही गुंतवणूकदारांनी पोलिसात तक्रारी केल्या. पोलिसांनी विजय यांचा मुलगा गणेशला अटकसुध्दा केली होती. तो नुकताच कारागृहातून सुटून आला होता.

हेही वाचा : बलात्कार प्रकरणातील आरोपीचा मुंबईला पळून जाण्याचा प्रयत्न, पोलिसांनी अकोल्यात ठोकल्या बेड्या

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण कुटुंब तणावात होते. त्यामुळे घरात पती आणि पत्नीमध्ये वाद सुद्धा होत होते. घरातील वाद एवढ्यात बरेच वाढले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय यांनी व्यवसायासाठी सोसायटीमधील पैसे वापरल्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढला होता. त्यामुळे घरात ताणतणाव वाढला होता. गेल्या एका आठवड्याभरापासून कुटुंबातील वातावरण बिघडले होते. आता न्यायालयातून संपत्ती जप्तीचे आदेश आले होते.

हेही वाचा : नागपूर: आर्थिक गुन्ह्यात तीनदा अडकलेले डॉ. धवनकर प्रत्येकदा कसे सुटतात? २१ महिन्याने पुन्हा रुजू

बदनामीच्या भीतीपोटी आत्महत्या

विजय पचोरी यांच्याघरी लोक पैसे मागायला येत होते. सतत पैसे मागण्याचा तगादा आणि कुटुंबाची होणारी बदनामी बघता कुटुंबियांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असावा, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कुटुंबातील चौघांची आत्महत्या ….बातमीत चौकट

तिघांचा खून करुन विजय यांची आत्महत्या?

विजय पचोरी यांचा मुलगा गणेश हा मध्यप्रदेशातील पांढूर्णा येथील एका आर्थिक घोटाळ्यातील आरोपी आहे. तो अनेक दिवस कारागृहात होता. तो काही दिवसांपूर्वीच कारागृहातून जामीनावर बाहेर आला होता. आर्थिक घोटाळ्यातील अडकल्यामुळे कुटुंबाची बदनामी झाली होती. पैशाचा तगादाही कायम होता. त्यामुळे विजय यांनी पत्नी, मुलगा गणेश व दीपक यांचा खून केल्यानंतर स्वत: गळफास घेतल्याची माहिती समोर आली आहे. कारण, पत्नी माला, दीपक आणि गणेश या तिघांचे हात दोरीने मागे बांधलेले होते. तर विजय यांचे हात मोकळे होते. त्यावरून तिघांचा खून करुन विजय यांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. नरखेड पोलीस त्या दिशेनेसुद्धा तपास करीत आहेत.