नागपूर : केवळ आधारकार्डवर एका लाखापर्यंत कर्ज देण्याचे आमिष दाखवून हजारो अल्पशिक्षितांची लाखो रुपयांनी फसवणुकीचा खेळ उपराजधानीत सुरु झाला आहे. या फसवणुकीचे सीताबर्डी-झाशी राणी चौक मुख्य केंद्र असून मोबाईल विक्रेत्यांसह काही नामांकित बँकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचाही या फसवणुकीत समावेश आहे. झाशी राणी चौकासमोर कृष्णा नावाच्या मोबाईल विक्रेत्याने आधारकार्डवर एका लाखापर्यंत कर्ज देण्याचा फलक दुकानासमोर लावला. कोणत्याही कागदपत्राविना आधारकार्डवर ऑनलाईन पद्धतीने कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष कृष्णा आणि त्याची टोळी दाखवतात. यासाठी कृष्णाने बाजुलाच असलेल्या एका बड्या मोबाईल विक्रेत्याला कटात सहभागी करून घेतले. त्यानंतर दोघांनी दोन मोठ्या बँकांच्या व्यवस्थापकाची भेट घेतली. त्यांनाही फसवणुकीच्या कटात सहभागी करून घेतले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ग्राहकाकडून आधारकार्ड घ्यायचे आणि त्यावर मोठ्या दुकानातून महागडा मोबाईल विकत घेत असल्याचे दाखवून नामांकित बँकेकडून कर्ज मंजूर करून घ्यायचे. तो मोबाईल पुन्हा त्याच दुकानात ठेवायचे. मोबाईल विक्री केल्याचे दर्शवून ग्राहकासोबत एक छायाचित्र घ्यायचे. ग्राहकाने मोबाईल खरेदीसाठी कर्ज घेतल्याचे दर्शवून मोठ्या दुकानदाराच्या खात्यात पैसे जमा करीत होता. त्यानंतर ग्राहकाला एका लाखाच्या मोबाईलच्या कर्जावर ६० ते ६५ हजार रुपये देत होता. मात्र, ग्राहकांना एक लाख रुपयांचे कर्ज बँकेत भरावे लागत होते. अशाप्रकारे शेकडो अल्पशिक्षितांना कृष्णाने फसवले असून त्यांच्याकडून लाखो रुपये कमावले आहेत.

हेही वाचा : नागपूर : श्रेया घोषालच्या कार्यक्रमामुळे वाहतुकीची कोंडी

अशी आली घटना उघडकीस

शारीफ ताडवी (इंदिरा मातानगर) या मजुराला पैशाची अत्यंत गरज होती. त्याने झाशी राणी चौकासमोरील कृष्णाचे मोबाईल दुकान गाठले. आधारकार्ड दिल्यानंतर त्याने २० हजार रुपयांची आवश्यकता असल्याचे सांगितले. कृष्णाने बाजुच्या दुकानात नेले आणि ३० हजार रुपयांचा मोबाईलसाठी बँकेतून कर्ज मंजूर केले. शारीफच्या हातात मोबाईल देऊन छायाचित्र काढले. त्यानंतर शारीफला केवळ १० हजार रुपये दिले आणि ३० हजार रुपयांचे बँकेचे हप्ते पाडून दिले. मात्र, खासगी बँकेतील कर्मचारी असलेल्या विलास नावाच्या मित्राने कृष्णाला जाब विचारून त्याचा डाव हाणून पाडला.

हेही वाचा : जम्मू-काश्मीरमधून पळून आलेले प्रेमीयुगुल पोलिसांच्या ताब्यात

हजारो नागरिकांची कर्जाच्या नावावर लूट

कृष्णाच्या या योजनेला शहरातीलच नव्हे तर खेड्यापाड्यातील हजारो गरजवंत बळी पडले. कृष्णाने बँक कर्मचाऱ्यांशी संगनमत करून आतापर्यंत मोबाईलच्या दुकानातून लाखोंचे कर्ज वितरित केले. मात्र, बँकेचा हप्ता भरताना दमछाक होत असल्यामुळे अनेक कर्ज घेणारे ग्राहक दुकानात येऊ लागले. दोन-तीन अंगरक्षक ठेवून त्याने ग्राहकांना दमदाटी करीत कर्जाची रक्कम भरण्यास बाध्य करण्यात येते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur fraud fake loans on aadhar card number to purchase mobile phones at sitabuldi area adk 83 css