नागपूर : महापालिकेच्या परिवहन विभागातर्फे २३ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेसदरम्यान १५९ विशेष आपली बससेवा चालवली जाईल. या विशेष बसेस दीक्षाभूमीपासून सुरू होऊन अंबाझरी, नारा, नारी, वैशालीनगर, नागसेन, राणी दुर्गावती चौक, आंबेडकर चौक (गरोबानगर), रामेश्वरी आदी मार्गांनी कामठी येथील ड्रॅगन पॅलेसला पोहोचतील. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देशभरातील बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीला भेट देतात. कामठी येथील ड्रॅगन पॅलेसही अनेकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे दीक्षाभूमीला येणाऱ्या अनुयायांना सोयीचे व्हावे म्हणून दरवर्षी बस व्यवस्था केली जाते. यंदाही ही सुविधा देण्यात आली आहे.
हेही वाचा : बौद्ध धर्माकडे वाढता कल, २५ हजार नागरिक घेणार बौद्ध धम्माची दीक्षा
७०४ स्वच्छता कर्मचारी
महापालिकेने स्वच्छता सुविधा सुनिश्चित करण्यासाठी ७०४ कर्मचारी तैनात केले आहेत. माताकचेरी, आयटीआय आणि जेल परिसर येथे ९०० शौचालये राहतील. नीरी रोड, काचीपुरा, लक्ष्मीनगर चौक, रहाटे कॉलनी चौक, यशवंत स्टेडियम, अंबाझरी तलाव आणि चुनाभट्टी रोड येथे सात फिरती शौचालये उभारण्यात येतील. विविध मार्गांवर २०० कचराकुंड्या, कचरा संकलित करणारी २० वाहने, शौचालये स्वच्छ करण्यासाठी चार सक्शन मशिन असतील. त्याशिवाय कंट्रोल रूममध्ये वॉटरवर्क, इलेक्ट्रिकल, सार्वजनिक बांधकाम विभाग, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी, अग्निशामक आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी असतील.