नागपूर : गोरेवाड्यात रविवारी दुपारी एका टिप्परने हैदोस घालून एका व्यावसायिकाला चिरडून चौघांना जखमी केले. या अपघातात मृत पावलेले व्यावसायिक जहूर हसन हे मुलाच्या घरी जाऊन परत येत होते. पिता-पुत्राची आणि नातवंडांची ती अखेरची भेट ठरली. तर मुलाची भेट घेऊन ते मुलीच्या घरी जात होते. मात्र, मुलीची भेट होण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने झडप घातली. या अपघात प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी टिप्परचालकासह मालकावरही गुन्हे दाखल केले. तसेच टिप्पर जाळणाऱ्यांवरही गुन्हे दाखल केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅरेजचे मालक असलेले जहूर हसन हे पत्नीसोबत गिट्टीखदानमधील गार्डन होम अपार्टमेंटमध्ये राहायचे तर त्यांचा मुलगा शारीक हसन ऊर्फ नूर हसन हे मानकापूर बायपास मार्गाजवळ राहतात. जहूर हसन रविवारी मुलाला भेटण्यासाठी गेले होते. बारा वाजता सुमारास ते मुलाची भेट घेऊन मुलीच्या भेटीसाठी निघाले होते. परंतु, काही वेळातच त्यांच्या मुलाला अपघात झाल्याचा फोन आला आणि अपघातात वडिल ठार झाल्याची माहिती मिळाली. मुलाने हंबरडा फोडला घटनास्थळ गाठले. जहूर यांच्याशी मुलाची ती अखेरचीच भेट ठरली.
रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गोरेवाडा परिसरातील पलोटी शाळेसमोर हा अपघात झाला होता. या अपघातात जहूर हसन (वय ७९) यांचा मृत्यू झाला होता. रविवारी ते कारने गोरेवाडाकडे कामानिमित्त निघाले होते. पलोटी शाळेजवळून जात असताना एका टिप्परने कारला मागून धडक दिली. त्यानंतर टिप्पर समोरील पानटपरीत शिरला. त्यात पानटपरीचालक राजकुमार दुबे (३५, पलोटीनगर) हे जखमी झाले. तेथे तीन ग्राहक सचिन यादव (३८, स्वागतनगर) हेदेखील जखमी झाले. पोलिसांनी शारीक हसन ऊर्फ नूर हसन यांच्या तक्रारीवरून टिप्परचालक अविनाश भोयर (२९, कन्हान) व मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अविनाशला अटक केली आहे.
टिप्परला आग लावणारे ताब्यात
अपघातानंतर घटनास्थळावर तणाव निर्माण झाला होता. संतप्त नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. घटनास्थळावरुन पोलीस बेपत्ता होताच सायंकाळी सात वाजता कृष्णा अशोक दुबे आणि जावेद खान अशफाक खान यांनी टिप्परला आग लावली आणि पळून गेले. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. कृष्णाच्या भावाच्या पानठेल्याचे अपघातात नुकसान झाले होते तर अशफाक हा या अपघातात थोडक्यात वाचला होता. त्यामुळे दोघांनी टिप्परवर राग काढून आग लावली, अशी माहिती पोलिसांनी दिली.