नागपूर : मोसमी पावसाने उपराजधानीची वाट अजूनही अडवून धरली आहे, पण सोमवारी चार वाजताच्या सुमारास झालेल्या पावसाने मात्र चांगलीच धडकी भरवली. कानठळ्या बसतील असा विजांचा कडकडाट आणि ढगांचा कडकडाट आज नागपूर शहराला हादरवून गेला. वीज आणि ढगांमध्ये जणू आवाजाचे तुंबळ युद्ध सुरू असल्याचा भास होत होता.
राज्यात वेळेआधीच पोहोचलेल्या मोसमी पावसाने अंदमान-निकोबार, केरळ, पुणे, मुंबई, कोल्हापूर असा प्रवास करत जूनच्या दुसऱ्या आठवड्यात विदर्भात प्रवेश केल्याचे भारतीय हवामान खात्याने घोषित केले. यवतमाळ, अकोला आणि त्यानंतर अमरावती, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये खात्याने मोसमी पाऊस दाखल झाल्याची घोषणा केली आणि दुसऱ्या दिवशीपासूनच विदर्भासह राज्यातील पावसाचे चित्र पालटले. मोसमी पाऊस हा सलग आणि संथ असतो, पण खात्याने घोषित केलेला पाऊस गडगडाटी, वादळी होता. तो जेवढ्या वेगाने आला, तेवढ्याच वेगाने परत गेला. त्यामुळे त्याला मोसमी पाऊस म्हणावे का, असा प्रश्नही उपस्थित झाला.
हेही वाचा : शिक्षण सचिव हाजिर हो! प्राध्यापकाला पेन्शन न दिल्यामुळे…
१२ तारखेनंतर मोसमी पाऊस अडकला तो अजूनही परतलेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा तापमानवाढीचा, उकाड्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या मोसमी पावसाच्या घोषणेनंतर ४२ ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंत विदर्भातील तापमान गेले. दरम्यान, विदर्भात आणि प्रामुख्याने राज्याच्या उपराजधानीत आज, सोमवारी धडकी भरवणारा पाऊस कोसळला. कानठळ्या बसतील असा विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट होता. वीज आणि ढगांमध्ये तुंबळ युद्ध तर सुरू नाही ना, अशी स्थिती आज, सोमवारी नागपूर शहरात निर्माण झाली होती. तब्बल दीड ते दोन तास ही स्थिती होती.
हेही वाचा : बाबा रामदेवच्या ‘कोरोनील’ विरुद्ध याचिका, उच्च न्यायालयाने विचारले, “कोणत्या अधिकाराचे हनन झाले ?”
आज पहाटेला आभाळ तर त्यानंतर मात्र असह्य उकाड्याची स्थिती होती. ४० अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान होते. पाऊस येईल, अशी परिस्थिती नसताना दूपारी चार वाजताच्या सुमारास आकाश ढगांनी काळवंडले आणि थोड्याच वेळात धो-धो कोसळला. वीजांचा कडकडाट हादरवून सोडणारा होता. तर ढगांनीही गडगडाट करत सोबत केली. त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. एरवी पाऊस आला तर कुठेतरी आडोसा शोधला जातो, पण कानठळ्या बसवणाऱ्या विजांच्या कडकडाटामुळे भीतीही होती. शहरात सुरू असणाऱ्या विकास कामांनी गोंधळात आणखी भर घातली. रस्त्यावर सगळीकडेच पाणी साचले होते. तर अनेक ठिकाणी रस्त्याची कामे सुरू असल्यामुळे वाहतुकीचाही गोंधळ उडाला.