नागपूर : झिरो माईलकडून शासकीय वस्तू संग्रहालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर विविध शासकीय कार्यालये असल्यामुळे दिवसभर वाहनांची वर्दळ असते. याच रस्त्यावर वाहतूक पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयाजवळ भवन्स शाळाही आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांच्या स्कूलव्हॅन आणि ऑटोंची संख्या मोठी असल्याने येथे अपघाताचा धोका कायम आहे.
झिरो माईल ते वस्तू संग्रहालय मार्गावर महापालिका, विधानभवन, जिल्हा न्यायालय, मुख्य पोस्ट कार्यालय, पोलीस नियंत्रण कक्ष, विभागीय आयुक्त कार्यालय, अन्न व नागरी पुरवठा विभाग कार्यालय आहे. याच मार्गावर भवन्स शाळा आहे. या शाळेत जवळपास पाच हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेतात. मुलांना शाळेत सोडण्यासाठी व परत नेण्यासाठी मोठी गर्दी असते. यामुळे सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीचा फटका विद्यार्थी आणि पालकांना बसतो. अनेक पालक बराच वेळ मुलांसह वाहतूक कोंडीत अडकलेले दिसतात. मात्र एकही वाहतूक पोलीस या रस्त्यावर दिसत नाही.
हेही वाचा : गडचिरोलीवर घोंगावणारे महापुराचे संकट टळले? मेडिगड्डाचे ८५ दरवाजे उघडे असल्याने थेट तेलंगणा सरकारला…
इतकी मोठी शाळा, पण वाहनतळ नाही
भवन्स शाळेला वाहनतळ नसल्यामुळे शाळेतील मुलांना ने-आण करणाऱ्या स्कूलव्हॅन आणि ऑटो शाळेसमोरच उभे केले जातात. वाहनतळ नसल्यामुळे शाळेच्या कर्मचाऱ्यांचीही वाहने बाहेर रस्त्यावरच असतात.
या रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या परिसरातून मिठा निम दर्गा, अजब बंगला, वनभवन, जिल्हा न्यायालय, वाहतूक कार्यालय, जीपीओ, पोलीस नियंत्रण कक्षासह अन्य शासकीय कार्यालयाकडे जाण्यासाठी मार्ग आहे. त्यामुळे येथे वाहतूक पोलीस तैनात करण्यात यावे, अशी मागणी पालकांनी केली आहे.
हेही वाचा : देशाला वाहतुकीची शिस्त लावणाऱ्या गडकरींच्या शहरात वाहतूक कोंडीमुळे नागरिकांच्या नाकीनऊ…..
या मार्गावर नेहमी वाहतूक कोंडी होते. या कोंडीवर वाहतूक पोलिसांनी पर्याय शोधावा.
विनोद मेश्राम, कार चालक
‘झिरो माईल’ चौकात वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांचे पथक कार्यरत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचीही पोलीस काळजी घेत आहेत.
अनिरुद्ध पुरी, पोलीस निरीक्षक, सीताबर्डी वाहतूक विभाग