नागपूर : आयटी कंपनीत असलेल्या एका व्यक्तीला सायबर गुन्हेगारांनी जाळ्यात ओढले. क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक करण्यास भाग पाडून १० लाख ७३ हजार रुपयांनी फसवणूक केली. त्यांनी स्वत:चे आणि पत्नीच्या बँक खात्यातील संपूर्ण रक्कम सायबर गुन्हेगाराच्या घशात घातली. मात्र, त्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ मिळाला नाही. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ओमकारनगर, अजनी येथील रहिवासी फिर्यादी राजेंद्र वाकोडेकर (३८) हे संगणक प्रोग्राम तयार करण्याचे काम करतात. त्यांना तंत्रज्ञानाविषयी बरीच माहिती आहे. २२ नोव्हेंबर २०२३ ला ते घरी असताना त्यांच्या मोबाईल आरोपीने व्हॉट्सअॅप मॅसेज केला. क्रिप्टो करन्सीला जगभरात प्रचंड मागणी आहे. सध्या क्रिप्टोची किंमत वाढत आहे. ऑनलाईन खरेदी-विक्रीत अनेक गुंतवणूकदार जुळले आहेत. क्रिप्टो सारखी करन्सी आमच्याकडे असून ती खरेदी केल्यास भरघोष नफा मिळेल असे आमिष दाखविले. त्याच्या आमिषाला बळी पडत राजेंद्रने गुंतवणूक केली. लाभ मिळाल्याने फिर्यादीचा विश्वास बसला. त्यांनी पुन्हा गुंतवणुकीची रक्कम वाढविली, पुन्हा लाभ मिळाला. त्यामुळे फिर्यादीचा पक्का विश्वास बसला.
हेही वाचा : नागपूर : विवाहितेची आत्महत्या; मैत्रिणीचा पैशांसाठी तगादा
राजेंद्र जाळ्यात अडकल्याचे पाहून आरोपीने त्यांना मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यांनी स्वतच्या बँक खात्यातील रक्कम गुंतविली. त्यांना लाभ केवळ ऑनलाईन दिसत होता. शिवाय त्यांना इंस्टाग्राम ग्रुपवरही जोडून घेतले. ग्रुपवरील सदस्य लाखांत लाभ झाल्याचे स्क्रीनशॉट टाकत होते. त्यामुळे राजेंद्रनेही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. लाभाची रक्कम काढण्यासाठी पुन्हा गुंतवणूक करण्यास बाध्य केले जात होते. अशा पध्दतीने राजेंद्रने पाच दिवसांत स्वत:चे आणि पत्नीच्या बँक खात्यातील १० लाख ७३ हजार रुपयांची गुंतवणूक केली. आता त्यांच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी काहीच उरले नव्हते. त्यांनी लाभ मागितला असता तो सुध्दा मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला.