नागपूर : भारतीय वायुदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी हे दोन दिवसांच्या नागपूर भेटीवर आले आहेत. त्यांनी आज बाजारगाव येथील सोलार इंडस्ट्रीजला भेट दिली. सोलार इंडस्ट्रीजमध्ये संरक्षण दलासाठी दारूगोळा निर्मिती केली जाते. येथे गेल्या रविवारी स्फोट होऊन सहा महिलांसह नऊ कामगारांचा मृत्यू झाला होता. हा मुद्दा विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही गाजला होता. वायुदल प्रमुख चौधरी यांनी सोलार इंडस्ट्रीज येथील विविध प्रयोगशाळा आणि सुविधांची पाहणी केली. कंपनीने विकसित केलेल्या नवीनतम उत्पादनांची माहिती घेतली.
हेही वाचा : मलकापुरातही गांजाची शेती, १९ लाखांचा माल जप्त
वायुदल प्रमुख चौधरी यांचे स्वागत सोलार ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे संस्थापक आणि कार्यकारी संचालक सत्यनारायण नुवाल यांनी स्वागत केले. वायुदलासाठी १२५ किलो वजनाचे बॉम्ब आणि चाफ आणि फ्लेअर्सच्या विकासाशी संबंधित दोन प्रकल्पांवर देखील त्यांना माहिती देण्यात आली. दरम्यान, एअर चिफ मार्शल चौधरी यांची या कारखान्याची भेट आधी ठरलेली होती, या भेटीचा येथे रविवारी झालेल्या स्फोटाशी काही संबंध नाही, असे संरक्षण दलाचे जनसंपर्क अधिकारी यांनी म्हटले आहे.