नागपूर : गेल्या काही दिवसांपासून प्रतिबंधित सुगंधित तंबाखू विक्रेत्यांनी धुमाकूळ घातला आहे. शहरातील प्रत्येक पानठेल्यावर प्रतिबंधित तंबाखूची सर्रास विक्री सुरु आहे. पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखा पथकाची आणि ठाणेदारांची कानउघडणी केल्यानंतर छापेमारी कारवाईचा धडाका सुरु केला आहे. रविवारी गणेशपेठ आणि यशोधरानगर हद्दीत पोलिसांनी छापा घातला. जवळपास ३ लाख रुपये किंमतीचा प्रतिबंधित तंबाखू पोलिसांनी जप्त केला.
गुन्हे शाखेच्या प्रत्येक पथकात एका कर्मचाऱ्याचे सुगंधित तंबाखू विक्रेत्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच ठाण्यातील डीबी पथकाचाही अर्थपूर्ण आशिर्वाद प्रतिबंधित तंबाखू विक्रेत्यांवर आहे. जरीपटका, गणेशपेठ, सक्करदरा, हुडकेश्वर, इमामवाडा, कोतवाली, कपिलनगर आणि नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत तंबाखू विक्रेत्यांनी बस्तान बसवले आहे. वरिष्ठांच्या कानावर तंबाखू विक्रेत्यांशी असलेल्या अर्थपूर्ण संबंधाची माहिती पोहचली. त्यानंतर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी लाखो रुपयांच्या प्रतिबंधित तंबाखूचा साठा जप्त केला आहे. एका ठिकाणी तर ऑटोतून बंदी असलेल्या तंबाखूची तस्करी सुरू होती.
हेही वाचा : गडचिरोली : खासदार अशोक नेतेंचा अपघात की घातपात? पोलिसांकडे व्यक्त केलेल्या शंकेवरून चर्चांना उधाण
यशोधरानगर व गुन्हे शाखेने या दोन्ही कारवाया केल्या. शनिवारी दुपारी चार वाजता यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या पथकाने हमीदनगरात ८६ हजार रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू जप्त केला. खबऱ्यांच्या माहितीवरून पोलिसांनी मोहम्मद शगीर मोहम्मद नजीर (५३) याच्या घरावर धाड टाकली. त्याच्या घरात प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये तंबाखू लपविण्यात आला होता. अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. ए. एन. खंदारे यांच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली. यशोधराचे ठाणेदार ज्ञानेश्वर भेदोडकर, श्याम कडू, अमोल भांबुरकर, मंगेश गिरी, किशोर धोटे, रामेश्वर गेडाम, रोहीत रामटेके, किशोर धोटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
हेही वाचा : नागपूर : बर्डी बाजारपेठेत दिवाळी खरेदीची तुफान गर्दी अन् दुकानाला आग
शनिवारी आठ वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेचे पथक गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असताना राजवाडा पॅलेससमोरील मार्गावर ऑटोमध्ये संशयास्पद मालाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी ऑटोला थांबविले. बैजुराम रंगूराम फटिंग (४२, वैष्णोदेवीनगर, कळमना) हा चालक ऑटो चालवत होता. ऑटोतून प्रतिबंधित तंबाखू आढळून आला. पोलिसांनी २.०७ लाखांचा तंबाखू जप्त केला. पोलिसांनी त्याला विचारणा केली असता रुपेश जेठानी (जरीपटका) याच्या सांगण्यावरून माल घेऊन जात असल्याचे फटिंगने सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून तंबाखू व ऑटो जप्त केला. त्याला गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले व जेठानीचा शोध सुरू आहे. ही कारवाई मुकेश राऊत, अनूप तायवाडे, विनोद गायकवाड, अनिल बोटरे व मनिष रामटेके यांच्या पथकाने ही कारवाई केली.