नागपूर : वातावरणात सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे यंदा कोणत्याच ऋतूचा अंदाज येईनासा झाला आहे. भारतीय हवामान खात्याच्या नवीन अंदाजानुसार आता महाराष्ट्रासह देशाच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे ही स्थिती उद्भवली आहे.
राज्याच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर पंजाबसह हरियाणा, चंदीगड व दिल्ली येथे दाट धुके व हलक्या पावसाची शक्यता आहे. मात्र, या पावसानंतर पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. वायव्य भारतात नव्या सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार झाला आहे आणि त्यामुळे देशाच्या हवामान काहीसा बदल होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : नागपूर : फुल व्यापाऱ्याच्या घरात घुसले दरोडेखोर; वृद्धेच्या गळ्यावर चाकू लावून…
भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाची देखील शक्यता आहे. प्रामुख्याने याचा परिणाम वायव्य भारतावर होण्याची शक्यता आहे. या वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावाखाली, अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपीट होईल, असेही हवामान खात्याने म्हंटले आहे. तामिळनाडू आणि केरळच्या काही भागात मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळेल.