नागपूर : महाराष्ट्रातल्या पेंच व्याघ्र प्रकल्पाला ‘इंटरनॅशनल डार्क स्काय पार्क’ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी तारे पाहण्याचा आनंद मिळवण्यासाठी मानवी वस्तीपासून दूर जावे लागू नये आणि आकाश निरीक्षणासाठी राखीव जागा आणि उद्याने तयार व्हावी यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘इंटरनॅशनल डार्क स्काय असोसिएशन’ ची स्थापना करण्यात आली. याच संस्थेने पेंच व्याघ्र प्रकल्पाला भारतातील पहिले ‘डार्क स्काय पार्क’ होण्याचा मान दिला.

पेंच व्याघ्र प्रकल्पाकडून गेल्या काही वर्षात रात्रीच्या आकाशाचे सौंदर्य जपण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे ‘इंटरनॅशनल डार्क स्काय असोसिएशन’ने ही मान्यता दिलेली आहे. त्यामुळे आता व्याघ्र प्रकल्पातील काही भागांमध्ये कृत्रिम प्रकाशामुळे होणारे प्रदूषण नियंत्रित करून आकाश न्याहाळणाऱ्यांसाठी पोषक वातावरण तयार करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. डार्क स्काय पार्क म्हणजे असे क्षेत्र आहे, जिथे फक्त नैसर्गिक प्रकाश असेल, कृत्रिम प्रकाशाचा अभाव असेल आणि त्या ठिकाणची हवा प्रदूषणमुक्त असेल. ज्यामुळे आकाश सहज न्याहाळता येईल. यात कोणताही बदल होऊ नये यासाठी या भागात प्रयत्न केले जातील. असा परिसर आकाश निरिक्षणसाठी उत्तम म्हणून जाहीर केला जातो आणि त्याच भागाला डार्क स्काय पार्क असे म्हणतात.

हेही वाचा : एअर इंडियाने नवीन विमान घेतले, पहिल्या लँडिंगसाठी केली “या” विमानतळाची निवड; कारण…

पेंच व्याघ्र प्रकल्पातील ‘डार्क स्काय पार्क’ हा आशियातला पाचवा प्रकल्प असून याआधी आशिया खंडात जपान आणि दक्षिण कोरियामध्ये असे प्रकल्प उभारण्यात आलेले आहेत. ‘इंटरनॅशनल डार्क स्काय असोसिएशन’ने पेंच व्याघ्र प्रकल्पाला दिलेल्या मान्यतेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर या व्याघ्र प्रकल्पाचे नाव कोरले जाणार आहे. ‘डार्क स्काय पार्क’ची परवानगी मिळाल्यामुळे जिल्हा नियोजन समितीकडून पेंच व्याघ्र प्रकल्पात रात्रीच्या वेळी आकाशाचे निरीक्षण करण्यासाठी एक स्वतंत्र वेधशाळा उभारण्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. यासोबतच प्रकाशाचं प्रदूषण कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातील. तसेच या डार्क स्काय प्रकल्पाबाबत स्थानिकांना माहिती दिली जाईल. सोबतच याबाबत प्रशिक्षणही दिले जाणार आहे. या व्याघ्र प्रकल्पातल्या सिलारी बफर झोन पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघोलीमध्ये आणखीन एक दुर्बीण बसवली जाईल. स्थानिक समुदायांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने पवनी बफर क्षेत्राच्या आजूबाजूच्या गावांमध्ये शंभरहून अधिक पथदिवे आणि सामुदायिक दिवे जमिनीकडे तोंड करून लावण्यात आलेले आहेत. त्यांची दिशा बदलण्यात आली आहे. यामुळे प्रकाश प्रदूषण कमी होतं आणि निशाचर परिसंस्थेला कमीत कमी व्यत्यय येतो, असे व्याघ्रप्रकल्पाचे उपसंचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ल यांनी सांगितले.

हेही वाचा : सावधान! दहावी, बारावीच्या परीक्षेत कॉपी आढळल्यास ‘ही’ कारवाई होणार…

पृथ्वीची गुपिते उलगडणार

पृथ्वीची गुपिते उलगडू पाहणाऱ्या खगोलप्रेमींसाठी आता वाघांची भूमी ही नेहमीच प्रेरित करणारी असेल, असे पेंच व्याघ्रप्रकल्पाचे उपसंचालक डॉ. प्रभूनाथ शुक्ल यांनी सांगितले. या व्याघ्र प्रकल्पाच्या परिसराला ‘डार्क स्काय पार्क’ म्हणून मान्यता मिळावी म्हणून अभिषेक पावसे याने व त्यांचा भाऊ अजिंक्य पावसे या हौशी खगोलप्रेमी तरुणाने प्रयत्न केले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader