नागपूर : जिओ टॉवर लावण्याच्या मोबदल्यात २५ लाख रुपये आणि नोकरीचे आमिष दाखवून देशातील हजारो नागरिकांना कोट्यवधीने गंडवणाऱ्या टोळीतील तब्बल ४२ जणांना नागपूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली. त्यांच्या शेकडो बँक खात्यातून कोट्यवधी रुपये आणि शेकडो भ्रमणध्वनी संच पोलिसांनी जप्त केले. या टोळीत कामठीतील दोन युवकांचा समावेश असून त्यांनी जवळपास दीडशेवर नागरिकांचे बँक खात्याचा वापर कोट्यवधी रुपये उकळण्यासाठी केला. पश्चिम बंगालमधील प्रणव मोंडल, सुभेन्दू मैती व रवींद्रनाथ बॅनर्जी अशी ‘जिओ टॉवर स्कॅम’च्या सूत्रधारांची नावे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कामठीतील आजनी गावात राहणारा बेरोजगार तरुण वैभव दवंडे आणि नागपुरातील कावरापेठमध्ये राहणारा कमलेश गजभीये हे दोघेही कोलकात्यातील ‘जिओ टॉवर स्कॅम’ टोळीचे सदस्य बनले. त्यांनी सावनेर, कळमेश्वर तालुक्यात फिरून अनाथ आश्रमांना देणगीचे पैसे घेण्यासाठी बँक खात्याची गरज असून त्या बदल्यात महिन्याला चार हजार रुपये देण्याचे आमिष दाखवले. त्यामुळे चार हजार रुपये महिना मिळणार असल्यामुळे दोन्ही तालुक्यातील शेकडो नागरिकांनी स्वत:चे आधारकार्ड, बँक पासबुक, धनादेश, एटीम कार्ड सर्वच कोलकात्यातील टोळीचे प्रमुख प्रणव मोंडल, सुभेन्दू मैती व रवींद्रनाथ बॅनर्जी यांना पाठवले. त्याने प्रत्येकाला चार हजार रुपये महिन्याला देणे सुरु केले. आरोपींनी प्रफुल सुधाकर गहुकर, प्रफुल शामकांत गणोरकर व प्रतीक दयाराम गहुकर याचेही अशाचप्रकारे खाते उघडले. त्या खात्यांचे एटीएम कार्ड हे कलकातामधील आरोपी अलाउ‌द्दीन शेख उर्फ श्रीमंत बछर याला पाठविले. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून तिघांच्याही खात्यात प्रत्येक दिवशी जवळपास ५ ते ५० लाख रुपये यायला लागले. त्यामुळे तिघेही बुचकळ्या पडले. त्यांनी सावनेर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल मस्के यांनी बँक खात्याचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

हेही वाचा : पाणी चोरी भोवली, २४५ घरांची नळ जोडणी तोडली

काय आहे ‘जिओ टॉवर स्कॅम’?

‘आम्ही जिओ कंपनीतून बोलत आहोत. तुमच्या जागेवर जिओ कंपनीचा टॉवर लावू दिल्यास त्याबदल्यात तुम्हाला २५ लाख रुपये खात्यात आणि २० हजार रुपये टॉवरचे भाडे आणि कुटुंबातील एकाला २० हजार रुपयांची नोकरी मिळेल,’ अशी बतावणी फोनवरुन देशातील अनेकांना करण्यात येत होती. विश्वास संपादन करण्यासाठी नागरिकांना जिओ कंपनी, डब्ल्यू.एच.ओ., डिपार्टमेन्ट ऑफ टेलीकम्युनिकेश, ट्राई यासारख्या भारत सरकारच्या विभागांचे बनावट कागदपत्रे व्हॉट्स अॅपद्वारे नागरिकांना पाठवत होते. त्यामुळे अनेक जण त्यांच्या आमिषाला बळी पडत होते. त्यानंतर वेगवेगळ्या नोंदणीच्या नावावर पैशांची मागणी करुन संपूर्ण भारतातील हजारो नागरिकांचे करोडो रुपयांची फसवणूक करण्यात येत होती.

असे फुटले टोळीचे बींग

वैभव दवंडे आणि कमलेश गजभीये यांना सावनेर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनी कोलकात्याला पाठविलेल्या बँक खात्याची माहिती काढली. त्या सर्व बँक खात्यात रोज करोडो रुपयांचे व्यवहार होत असल्याचे लक्षात आले. त्यांनी कोलकात्यातील सिद्धार्थ दास आणि दीप सेन उर्फ सौरव चाकी व बाबुदा उर्फ मनोरंजन मैती यांना नयाबाद शहरातून अटक केली. हे तिघे कोलकात्यामधील वेगवेगळ्या एटीएम मशिनधून रोज लाखो रुपये काढण्याचे काम करीत होते. प्रणब मोंडल याच्या नातेवाईकांचे नावावर या फसवणुकीतून कमावेल्या कोट्यवधी रुपयांची संपत्ती घेतल्याचे दिसून आले. एका खात्यातून १५ लाख तर त्याच्या वडिलांच्या नावावरील ३६ लाखांची एफडी, महागड्या कार पोलिसांनी जप्त केल्या.

हेही वाचा : मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू – खांडेकर

कॉल सेंटर उभारुन देशभरात गोरखधंदा

प्रणव मोंडल, सुभेन्दू मैती व रवींद्रनाथ बॅनर्जी यांना देशभरातील नागरिकांना लुबाडायचे होते. त्यामुळे दीप सेन व बाबुदा मैती यांनी नयाबाद शहरात कॉल सेंटर उभारले होते. तेथे १४ पुरूष व १९ महिलांना ३० हजार रुपये महिना देऊन कॉल लावण्याचे काम करण्यात येत होते. नयाबादसारख्या अनेक शहरात बनावट कॉल सेंटर सुरु करुन शेकडो बेरोजगारांना गलेलठ्ठ पगार देऊन लोकांना टॉवर लावण्याचे आमिष दाखवून फसविण्याचा गोरखधंदा सुरु केला होता. पोलिसांनी तब्बल ७ कोटी रुपये, शेकडो भ्रमणध्वनी संच, हजारो सीमकार्ड जप्त केले आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur jio tower scam gang arrested for looting people for crores of rupees adk 83 css