नागपूर : नोकरीतून निलंबित केल्यानंतर पक्षकाराची न्यायालयात बाजू मांडणाऱ्या वकिलाने पैशाच्या वादातून पक्षकाराचा कुऱ्हाडीने घाव घालून खून केला. या हत्याकांडात वकिलाच्या मुलानेही सहभाग घेतला. ही घटना रविवारी मध्यरात्री जरीपटक्यात घडली. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी आरोपी वकील व त्याच्या मुलाला अटक केली आहे. अॅड. अश्विन मधूकर वासनिक (५६) आणि अविष्कार अश्विन वासनिक (२३) दोघे रा. अंबादे आटा चक्कीजवळ, इंदोरा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर हरिष दिवाकर कराडे (६०, रा. प्लॉट नं. ५५५, हुडको कॉलनी, जरीपटका) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
हरिष कराडे हे वायुसेनेत नोकरीवर होते. नोकरी करीत असताना एका प्रकरणात त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी अॅड. अश्विन वासनिक यांची भेट घेतली. त्यांना प्रकरणाची माहिती देऊन न्यायालयात बाजू मांडण्याची विनंती केली. त्या प्रकरणात अॅड. वासनिक याने बाजू लढवली आणि निलंबनाचा आदेश रद्द करून पुन्हा कराडे यांना नोकीर घेण्यात आले. तेव्हापासून हरिष कराडे आणि अॅड. अश्विन वासनिक यांच्यात मैत्री झाली.
हेही वाचा : भयंकर…धावत्या बसवर वीज कोसळली, महिला वाहक…..
दोघांचेही कौटुंबिक संबंध होते. गेल्या दोन वर्षांपूर्वी हरिष हे वायुसेनेतून सेवानिवृत्त झाले होते. आरोपी वकील अश्वीन आणि मृतक हरिष कराडे हे पूर्वी एकाच परिसरात राहत होते. त्यानंतर वासनिक इंदोरात रहायला गेला. आरोपी वकील व हरिष कराडे यांना सोबत दारु प्यायची सवय होती. ते नेहमीच रात्री उशिरापर्यंत दारु पित बसत होते. रविवारी रात्री हरिष कराडे आरोपी वकील अश्विनच्या घरी गेले. तेथे दोघांनी रात्री २ वाजेपर्यंत सोबत दारु ढोसली. त्यांच्यात पैशाच्या कारणावरून वाद झाला. वादाचे रुपांतर शिविगाळीत झाले. त्यानंतर आरोपी वकील अश्विन आणि त्याचा मुलगा अविष्कारने कुऱ्हाडीने हरिष कराडेवर घाव घातले. काही वेळातच कराडे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला.
या प्रकरणी हरिष कराडे यांची पत्नी सोनाली हरिष कराडे (३०, रा. हुडको कॉलनी, जरीपटका) यांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका ठाण्याचे उपनिरीक्षक मारोती जांगीलवाड यांनी आरोपी वकील अश्विन आणि त्याच्या मुलाविरुद्ध हत्याकांडाचा गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली आहे.
सहा महिन्यांपूर्वीच थाटलेला संसाराचा डाव
हरिष कराडे हे वायुसेनेतून सेवानिवृत्त झाले होते. सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या पैशातून त्यांनी मोठे घर बांधले होते. परंतु, घरात एकटेच असल्यामुळे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांची आठ महिन्यांपूर्वीच सोनाली (वय ३०) हिच्याशी ओळख झाली. ती घटस्फोटीत असून तिला एक मुलगी आहे. तिलाही लग्न करून संसार थाटायचा होता. त्यामुळे वृद्ध कराडे यांनी सोनालीला लग्नाची मागणी घातली. तिनेही लग्नास होकार दिला. गेल्या सहा महिन्यापूर्वीच त्यांनी सोनालीशी लग्न केले. दोघांचाही संसार सुरळीत सुरु होता. मात्र, पतीचा खून झाल्यामुळे सहा महिन्यांपूर्वीच थाटलेला संसाराचा डाव अर्धवट मोडला.