नागपूर : महानिर्मितीकडून खासगी कोल वाॅशरिजमध्ये कोळसा धुण्याचे काम हे मोठ्या भ्रष्टाचाराला आमंत्रण आहे. या वाॅशरिजच्या अर्थकारणात सत्ता पक्षातील काही नेत्यांचा वाटा आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. नागपुरातील अंबाझरीसह पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यावर रविभवनमध्ये झालेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते. दानवे म्हणाले, महानिर्मितीकडून प्रती टन कोळशाच्या दराएवढेच दर कोळसा धुण्यासाठी दिले जात आहे. हा सर्व व्यवसाय विशिष्ट लोकांच्या स्वार्थासाठी होत आहे. कोल वाॅशरिजमधून बाजारातही छुप्या पद्धतीने कोळसा अवैध विक्रीसाठी जात आहे. या सर्व अर्थकारणात सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांचाही सहभाग आहे.
हेही वाचा : धक्कादायक.. रुग्णाचे पाय वर रहावे म्हणून रुग्णशय्येखाली सिमेंटचे गट्टू; मेयो रुग्णालयात चालले काय?
कोल वाॅशरिजच्या या दादागिरीमुळेच एकीकडे महानिर्मितीच्या प्रकल्पात कोळसा टंचाई आहे, तर दुसरीकडे महानिर्मितीचा लक्षावधी टन कोळसा वाॅशरिजमध्ये पडून असल्याचेही दानवे यांनी सांगितले. ‘लोकसत्ता’ने मंगळवारी वृत्तातून महानिर्मितीने काम दिलेल्या विविध खासगी कोल वाॅशरिजमध्ये लक्षावधी टन कोळसा एकीकडे पडून असतांनाच दुसरीकडे महानिर्मितीच्या वीज निर्मिती प्रकल्पात मात्र कोळसा टंचाई असल्याचे पुढे आणले होते. या प्रकारामुळे कोळसा टंचाई अभावी वीज निर्मितीवर परिणाम झाल्यास जबाबदार कोण, हा प्रश्नही या घटनेमुळे उपस्थित झाला होता.