नागपूर: नागपूर लोकसभा मतदारसंघात ५४.३० टक्के मतदान झाले. येथे दीड लाख हलबा मतदार आहे. आरक्षणाच्या मुद्यावर त्यांच्यात विद्यमान सरकारविरोधात रोष होता. तो निवडणुकीत अडचणीचा ठरू शकतो म्हणून सत्ताधाऱ्यांनी हा समाज आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न केले तर हलबांचा कौल आपल्याकडे वळावा म्हणून महाविकास आघाडीने प्रयत्न केले. त्यामुळे मतमोजणीनंतरच खरे चित्र स्पष्ट होईल. असे असले तरी दोन्ही बाजूंनी हलबांच्या मतांवर दावे केले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर लोकसभा मतदारसंघातील हलबा समाजाची लोकसंख्या अधिक असलेल्या मध्य नागपुरातील गोळीबार चौक, नाईक तलाव, तांडापेठ, बांगलादेश, विनकर काॅलनी, टिमकी आदी भागात मतदान जास्त झाले. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हलबा समाजाला सहा महिन्यात त्यांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन भाजप उमेदवार नितीन गडकरी यांनी दिले होते. त्यामुळे या निवडणुकीत समाजाने भाजपच्या बाजूने कौल दिला होता. गडकरी मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले. परंतु हलबांचा प्रश्न सुटला नाही.

हेही वाचा : ‘एमपीएससी’च्या परीक्षा नियंत्रक पदाचा विषय पुन्हा चर्चेत, काय आहे प्रकरण? वाचा…

२०१९ च्या निवडणुकीतही हा समाज भाजपच्या बाजूने उभा असल्याचे मतदानातून दिसून आले. मात्र मुद्दा यंदाच्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांनी प्रचारात लावून धरला. हलबांमध्ये भाजप आणि सत्ताधाऱ्यांविरोधातील नाराजीचा लाभ घेण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे आणि इतर दिग्गज नेत्यांची सभा मध्य नागपुरातील गोळीबार चौकातच सभा घेतली. त्याला प्रतिसादही मिळाला. निवडणूकी दरम्यान निवडणूक काळातच हलबा समाजाचे प्रतिष्ठित नागरिक व माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी चंद्रभान पराते यांना जात वैधता प्रमाणपत्राच्या मुद्यावरून सेवेतून बडतर्फ करण्यात आले. त्यामुळे हलबा जातवैधता प्रमाणपत्राच्या विषयावर केंद्र व राज्य सरकारच्या सेवेतील अधिकारी- कर्मचारी एकटवले. त्या सर्वांनी सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्याचे आवाहन समाज बांधवांना केले.

हलबांच्या राष्ट्रीय आदिम कृती समितीनेही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदानाचे आवाहन करत हलबा बहुल भागात बैठकींचा धडाका लावला. त्यामुळे भाजप उमेदवार नितीन गडकरी यांची चिंता वाढली. त्यानंतर भाजप नेते नितीन गडकरी, आमदार विकास कुंभारे यांच्यासह इतरानी हलबा समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या वैयक्तिक भेटी घेण्यासह त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे भाजपच्या सर्व माजी हलबा नगरसेवकांना समाजाची समजूत काढण्याची जबाबदारी दिली गेली. निवडणूकीच्या दिवशीही या हलबा नेत्यांना बुथवर बसवून मतदान भाजपच्या बाजूने काढण्याची जबाबदारी दिली गेली. दुसऱ्या बाजूने नोकरी अडचणीत आलेल्या हलबा बांधवांनी आपल्या नातेवाईकांना भ्रमणध्वनीकरून सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी विरोधात मतदानाचे आवाहन केले.

हेही वाचा : वन्यप्राण्यांच्या पिल्लांना ‘येथे’ मिळणार मायेची ऊब, भारतातील पहिले स्वतंत्र “पेडियाट्रिक सेंटर”

दरम्यान या गोंधळात गोळीबार चौक ते टिमकी परिसरात सर्वसामान्यांमध्ये निम्मे मतदान दोन्ही पक्षाकडे सारखे असल्याचा कल नोंदवला गेला तर तांडापेठ, नाईक तलाव, विनकर काॅलनी या भागात मात्र भाजपकडे कल जास्त असल्याची चर्चा आहे. परंतु मध्य नागपूर वगळता इतर मतदार संघात मात्र काँग्रेसकडे कल जास्त राहिल्याचा अंदाज हलबा समाजातील नेत्यांकडून वर्तवला जात आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात सुमारे दीड लाख हलबा मतदार आहे. त्यापैकी मध्य नागपुरात ८० ते ८५ हजार मतदार असून उर्वरित इतर भागात आहे हे येथे उल्लेखनीय

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur lok sabha bjp candidate nitin gadkari halba community votes vikas thackeray mnb 82 css