नागपूर : ओबीसींना अजूनही आरक्षणाचा पुरेसा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे ५२ टक्के आरक्षण ओबीसींना देण्यात यावे. त्यानंतर इतरांना आरक्षण द्यावे, अशी मागणी लोकजागर अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी पत्रकार परिषदेत केली. लोकजागर अभियानाच्यावतीने ओबीसी आरक्षणाबाबत पुढील दिशा ठरवण्यासाठी दोन डिसेंबरला दुपारी एक वाजता आग्याराम देवी चौकातील गुरुदेव सेवा मंडळ आश्रमात समविचारी नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
हेही वाचा : शहीद गोवारी स्मृती दिन आज : गोंडगोवारी असूनही शिष्यवृत्तीपासून वंचित; काय आहे गोवारी समाजाच्या समस्या?
याबाबत पत्रपरिषदेत माहिती देताना वाकुडकर म्हणाले की, ओबीसी समाजाने कधीच मराठा आरक्षणाला विरोध केला नाही. परंतु, ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावून इतरांना आरक्षण देणे गरजेचे आहे. ओबीसींची ५२ टक्के लोकसंख्या असून त्यानुसार ओबीसींना ५२ टक्के आरक्षण देणे गरजेचे आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात ३३ मुख्यमंत्री झाले. यातील २१ मुख्यमंत्री मराठा समाजाचे होते. त्यात एकाही कुणबी मुख्यमंत्र्यांचा समावेश झाला नाही. त्यामुळे सत्तावाटपाच्या वेळी मराठा आणि कुणबी एक नसतात काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शासनाने बिहारच्या धर्तीवर जातीनिहाय जनगणना करावी, अशी मागणीही त्यांनी केली. पत्रपरिषदेला नंदकिशोर अलोणे, प्रमोद मिसाळ, बळवंत भोयर आदी उपस्थित होते.