नागपूर : ‘सेट तयार झाला का, अमूक कुठे आहे?’, अशा प्रश्नांची विचारणा, त्या अनुषंगाने सुरू असलेली लगबग, उत्साह आणि धाकधूकही, परीक्षक आणि स्पर्धेबद्दलची उत्सुकता, जिंकण्याची ईर्षा पण तितकाच खिलाडूपणा आणि प्रतिस्पर्धी संघालाही मदत करण्याची तयारी… अशा वातावरणात, तरुणाईच्या जल्लोषात सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत व भारती विद्यापीठ, पुणे आणि शिवरत्न शिक्षण संस्था, अकलूज संचालित विजयसिंह मोहिते-पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग ॲण्ड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने ‘लोकसत्ता लोकांकिका’ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची बुधवारी सुरुवात झाली. विषयांतील वैविध्य आणि आविष्कारातील नाविन्य हे या स्पर्धेचे अनोखे वैशिष्ट्य ठरले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : लग्न करणे सोपे मात्र विवाह प्रमाणपत्र मिळवणे कठीण; काय आहे वाचा…

फेरीच्या पहिल्या दिवशी दर्जदार एकांकिका मोठ्या उत्साहात सादर करण्यात आल्या. सामाजिक विषयांवर विद्यार्थ्यांनीच लिहिलेल्या संहिता हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले. ‘सुख विकणारा माणूस’ या नाटकाने शेतकरी कुटूंबातील महिलेवर होणारा अत्याचार, घरातील अठराविश्व दारिद्र, मुलीचे लग्न या गंभीर विषयाकडे लक्ष वेधले तर दोन भावांमधील वाद, दुभंग व्यक्तिमत्त्व यासारख्या विषयांची मांडणी एकांकिकांमधून करण्यात आली. यावेळी तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. अनेक महाविद्यालयातील विद्यार्थी आपल्या मित्रांच्या एकांकिका पाहायला आले होते. यावेळी तरुणाईच्या टाळ्या, हिप हिप हुर्रे… अशा जल्लोषात सभागृह दुमदुमले होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur loksatta lokankika competition starts dag 87 css