नागपूर : कडाक्याच्या थंडीत गणेशपेठ पोलिसांना एक ४५ वर्षीय महिला जखमी अवस्थेत आढळली. तिच्या डोक्यातील जखमेत अळ्या पडल्या होत्या. पोलिसांनी तिला मेडिकल रुग्णालयात दाखल केले. मेडिकलच्या डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करत जीवदान दिले. गणेशपेठ भागात २९ ऑगस्ट २०२३ रोजी ४५ वर्षीय निराधार महिला वनवन भटकताना आढळली. तिच्या डोक्याला मोठी जखम होऊन त्यात अळ्या पडल्या होत्या. त्या जखमेतून दुर्गंधी येत होती. मेडिकलच्या शल्यक्रिया विभागाच्या आकस्मिक विभागात रुग्णावर डॉ. ब्रिजेश गुप्ता, डॉ. सुबोध, डॉ. शिखा यांनी उपचार सुरू केला.
रुग्णावर तब्बल तीन महिने उपचार झाले. माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार यांनी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून, रुग्णास भेटी देऊन उपचारास आवश्यक ती मदत पुरवली. रुग्णात हळूहळू सुधारणा होत गेली, त्यानंतर डोक्यावर प्लास्टिक सर्जरी करून उपचार करण्याकरिता प्लास्टिक सर्जरीला पाठवण्यात आले. परंतु, रुग्ण उपचारासाठी प्रतिसाद देत नव्हती. त्यावर वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी रुग्णांस स्वत: भेट देऊन समुपदेशन केले.
हेही वाचा : राज्यातील पहिले ‘स्मार्ट कॅफे टॉयलेट’, काय आहेत वैशिष्ट्ये? जाणून घ्या…
समाजसेवा विभागाकडून मदत
सदर रुग्णावर उपचारादरम्यान समाजसेवा विभागामार्फत सातत्याने भेटी देत बोलके करण्यात आले. रुग्णाने स्वतःचे नाव साहिबा प्रधान रा. बेलदा बाजार, जिल्हा- मेदनापूर, पश्चिम बंगाल अशी तुटक-तुटक माहिती दिली. त्या आधारावर पोलीस अधीक्षक कार्यालय मेदनापूर यांच्याशी संपर्क करून नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. परंतु, नातेवाईक आढळले नाही. शेवटी मिशनरी ऑफ चॅरिटी मदर तेरेसाज होम, शांती भवन, काटोल रोड, नागपूर येथे रुग्णाची सोय केली गेली. अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनीही वेळोवेळी रुग्णाला मदत केली.