नागपूर : नागपूर शहरात पहिल्यांदाच होत असलेल्या अतिरिक्त महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. प्रदर्शनात ३०० स्टॅाल्स असून ग्रामीण भागातील स्वयं सहाय्यता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाची एकूण विक्री तब्बल १ कोटी ६३ लाख ५५ हजार रुपये झाली आहे. नागपूर येथे २६ फेब्रुवारीपर्यंत अतिरिक्त महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. १७ तारखेपासून शुभारंभ झालेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला नागपूरकरांनी मोठा प्रतिसाद दिला असून खाद्यपदार्थांच्या मेजवानीचा मनमुराद आस्वाद नागपूरकर दररोज घेत आहेत.
खाद्यपदार्थांसोबतच ग्रामीण भागातील महिला निर्मित विविध उत्पादने या ठिकाणी विक्रीस ठेवलेली आहेत. यामध्ये लाकडी खेळणी, दागिने, सजावटी वस्तू, कोल्हापूरची चप्पल, भिवापूरची प्रसिद्ध मिरची, विविध मसाले, बांबूच्या वस्तू, पापड, कपडे, घाणीचे तेल, करवत कटी साडी, हायड्रोपोनिक भाजीपाला, बिस्किट, प्रीमिक्स, गोट मिल्क सोप, कडधान्य, तांदूळ अशा अनेक वस्तू या ठिकाणी विक्रीस उपलब्ध आहेत.
हेही वाचा : विदर्भ आणि मराठवाड्यातील ‘या’ जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’, अवकाळी पावसाचा इशारा
दररोज सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी देखील नागपूरकरांना या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या दैनंदिन गरजा, तसेच त्यांचे आरोग्य, कुटुंबातील आर्थिक नियोजन, महिलांना कायदे विषयक सल्ला अशा विविध प्रशिक्षणाचे देखील आयोजन दररोज करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या कालावधीत आणखी कोट्यवधी रुपयांची विक्री होईल, असा विश्वास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी व्यक्त केला. २६ फेब्रुवारीपर्यंत असणाऱ्या या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला नागपूरकरांचा असाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.