नागपूर : शहरातील नेत्यांची एकमेकांविरुद्ध कुरघोडी आणि देवडिया काँग्रेस भवनातील पक्षाच्या कार्यक्रमांना दांडी हे चित्र गेले काही वर्षांपासून नागपूर काँग्रेसमध्ये आहे. मात्र, लोकसंवाद यात्रेच्या बैठकीच्या निमित्ताने शहरातील परस्परविरोधी गटांचे नेते आज एका व्यासपीठावर दिसले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पूर्व विदर्भातील लोकसंवाद यात्रेची जबाबदारी आहे. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातून पदयात्रा ३ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पटोले यांनी आज रविभवन येथे बैठक बोलावली.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, माजी मंत्री नितीन राऊत, माजी मंत्री सुनील केदार, माजी आमदार अशोक धवड, शहराध्यक्ष विकास ठाकरे, आमदार ॲड. अभिजीत वंजारी उपस्थित होते. त्यांनी लोकसंवाद यात्रा एकजुटीने यशस्वी करण्याचा संदेश देण्यासाठी हातात हात घालून उंचावले.
हेही वाचा : कोतवाल भरती: अकोला जिल्ह्यातील १४७ पदांसाठी साडेतीन हजारांवर उमेदवार स्पर्धेत
दरम्यान, लोकसंवाद यात्रा विधानसभा मतदासंघनिहाय काढण्यात येणार आहे. या प्रत्येक मतदारसंघातील पदयात्रेचे नेतृत्व नाना पटोले करणार आहेत. सहा जिल्ह्यात लोकसंवाद पदयात्रा ३ ते १२ सप्टेंबर या कालावधीमध्ये काढण्यात येत आहे. राज्य आणि केंद्र पातळीवर मुद्याशिवाय स्थानिक मुद्यांवर भर देण्याची सूचना पुढे आली. ती सर्व संमतीने मान्य करण्यात आली.