नागपूर : ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरातील शारदा चौक परिसरात महावितरणच्या दोन बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांनी एका बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्याला मारहाण केली. या कर्मचाऱ्याने वीज देयक थकवणाऱ्याचा पुरवठा खंडित केल्यावर ही मारहाण झाली. त्यामुळे दोन कर्मचाऱ्यांचे या ग्राहकाशी साटेलोटे होते काय, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महावितरणच्या नवीन सुभेदार शाखा कार्यालयातील बाह्यस्त्रोत तांत्रिक कर्मचारी विजय भालेराव यांनी २४ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास वरिष्ठांच्या सूचनेनुसार रवींद्र बन्सोड या थकबाकीदार ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर रात्री ९ च्या सुमारास ग्राहकाने थकबाकी भरली. त्यानंतर विजय भालेराव याने या ग्राहकाचा पुरवठा पूर्ववत केला.
हेही वाचा : खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण, असे आहेत आजचे दर…
दरम्यान, महावितरणच्या वाठोडा शाखा कार्यालयातील बाह्यस्त्रोत कर्मचारी समीर हांडे याने विजय भालेराव यास भ्रमनध्वनी करुन बन्सोड यांचा वीजपुरवठा खंडित केल्याबाबत जाब विचारला. त्यानंतर विजयला शारदा चौकात भेटायला बोलवले. तेथे समीर हांडे आणि मानेवाडा उपविभागातील बाह्यस्त्रोत कर्मचारी किशोर कुटरूंगे या दोघांनी विजयला वीजपुरवठा खंडित का केला असे विचारुन वाद घातला. त्यानंतर दोघांनीही विजयला मारहाण केली. याप्रकरणी विजय भालेराव याने समीर हांडे आणि किशोर कुटरूंगेविरोधात हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा : प्रजासत्ताक दिनानिमित्त उपराजधानीत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, गर्दीच्या ठिकाणी…
कठोर कारवाईची सूचना
एका बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्याला दोघा बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांकडून झालेली मारहाण प्रकरणाची महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करुन दोषींविरोधात कठोर कारवाई करण्याची सूचना महावितरण प्रशासनाने संबंधित एजन्सी आणि कार्यकारी अभियंत्यांना दिली आहे.