नागपूर : रस्त्याच्या मधोमध वाहन उभे करून प्रेयसीसोबत गप्पा करणाऱ्याला वाहन बाजू घेण्यास सांगणे एका युवकाला चांगलेच महागात पडले. प्रेयसीसमोर अपमान झाल्यामुळे दोघांनी एका युवकाच्या पोटात चाकू भोसकला. जखमी अवस्थेत त्याला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिवा पवाडे (२७) रा. गार्ड लाईन, रेल्वे क्वॉर्टर, असे जखमी युवकाचे नाव आहे.
ही घटना तहसील पोलीस ठाण्याअंतर्गत घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून मुख्य आरोपीला चार तासांत अटक केली. मोहम्मद अजनान (२२) असे आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार मो. शिजान ऊर्फ बडू हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
हेही वाचा…मतदान केंद्रावरील कर्मचारीच म्हणतो, बोटाला शाई कशाला हवी?
जखमी शिवा कारच्या शोरुममध्ये काम करतो. गुरुवारी रात्री शिवा कामावरून घरी जात असताना अजनान व त्याचा साथीदार बडू हे दोघेही गार्ड लाईन परिसरात रस्त्यावर दुचाकी आडवी करून अजनानच्या प्रेयसीसोबत गप्पा मारत होते. शिवाने हॉर्न वाजवून रस्ता मोकळा करण्यास सांगितले. त्यामुळे अजनानची प्रेयसी तिथून निघून गेली. संतापलेल्या आरोपींनी शिवावर चाकूने वार केले. शिवाची आई धावून आली. त्यांनी मेयो रुग्णालयात दाखल केले. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अजनान याला अटक केली.