नागपूर : मुलीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी महिलेने मैत्रिणीकडून ७२ हजाराचे कर्ज घेतले आणि व्याजासह १ लाख ३८ हजार परत केले. त्यानंतरही मैत्रिणीने चक्रवाढ व्याज लावून ३ लाखांची मागणी केली. पैशाचा तगादा लावल्यामुळे घाबरलेल्या विवाहितेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात वाडी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. किर्ती राहुल मेश्राम (२८ हिलटॉप कॉलनी, वाडी) असे मृत महिलेचे नाव असून प्रिती सचिन संतापे (३५, पुरुषोत्तमनगर, आठवा मैलजवळ, वाडी) असे आरोपी मैत्रिणीचे नाव आहे.
२४ नोव्हेंबर रोजी किर्ती मेश्राम ही वाडीत पती व दोन वर्षाच्या मुलीसह भाड्याने राहायची. दुपारच्या सुमारास किर्तीने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. आपल्या पत्नीने अवघ्या दोन वर्षाच्या मुलीचा आणि संसाराचा विचार न करता अचानक असे टोकाचे पाऊल का उचलले? या विचाराने तिचे पती राहुल धर्मपाल मेश्राम हे व्यथित झाले होते. त्यांनी पत्नीचा मोबाईलदेखील तपासला, मात्र काहीच आढळले नाही. घरात शोधाशोध करत असताना त्यांना तिची ‘सुसाईड नोट’ आढळली. किर्तीने प्रिती सचिन संतापे या तिच्या मैत्रिणीकडून मुलीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी ७२ हजार रुपये कर्ज घेतले होते. प्रितीने सहा महिन्यांनी किर्तीकडे १५ टक्के चक्रवाढ व्याजासह १ लाख ३८ हजार रुपये वसूल केले.
हेही वाचा : गुन्हे शाखा कार्यालयात शिरला साप; पोलीस अधिकाऱ्याने…
त्यानंतर मुद्दल रकमेवरील व्याजापोटी आणि कर्ज परत करण्यास उशिर केल्याच्या दंडासह तीन महिन्यांत ३ लाखांची मागणी केली. ही रक्कम किर्तीसाठी जास्त होती. तिला पैसे परत करण्यास उशीर झाला. यावरून प्रितीने किर्तीला वाईट शब्दांत रागावले होते. शिवाय तिचा पाणउतारा करत मानसिक त्रासदेखील दिला. यामुळे किर्ती दहशतीत आली. पतीने पैशांची व्यवस्था करू असे सांगितले होते. मात्र किर्ती तणावात आली होती व अखेर तिने आत्महत्या केली. पोलिसांनी आरोपी प्रितीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.