नागपूर : घरात दिवाळी सणाची तयारी सुरु असतानाच पतीसह सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी सुनेचा छळ केला. शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून सूनेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पतीसह सासरच्या चौघांवर हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला. रितू राहुल पटले (२६, रा. ओमनगर, कोराडी) असे मृत विवाहितेचे नाव आहे. राहुल पटले हा भूखंड खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो. गेल्या १० मे रोजी राहुलचे मध्यप्रदेशातील बालाघाट शहरातील सेवकराम टेंभरे यांची मुलगी रितूशी लग्न झाले होते.

नवविवाहित रितूला लग्नाच्या पहिल्याच दिवशी पती राहुलने हुंड्यासाठी मारहाण केली होती. तसेच तिच्या वडिलांचा अपमान करीत शिवीगाळ केली होती. रितूला रोज माहेरून हुंडा आणण्यासाठी त्रास देणे सुरु होते. सासू रेखा राजेश पटले (५५) आणि दोन्ही ननंद राणी रहांगडाले आणि मिनू या तिघीही रितूला मारहाण करीत होत्या. तिला घरात कोंडून ठेवण्यात येत होते. वडिल गरीब असल्यामुळे रितूने गेल्या पाच महिन्यांपासून कोणतीही तक्रार न करता संसार केला.

हेही वाचा : ‘ते’ प्रवाशी मोठ्या आशेने दिवाळीसाठी गावी निघाले मात्र…

मात्र, दिवाळीत माहेरून सोन्याचे दागिने आणण्यासाठी तिला मारहाण करण्यात आली. दागिने न आणल्यास घरातून बाहेर काढण्याची धमकी दिली. ऐन दिवाळीत आई-वडिलांच्या घरी परत जाण्याऐवजी रितूने आत्महत्या करून जीवन संपविण्याचा पर्याय स्वीकारला. रितूने ११ नोव्हेंबरला रात्री आठ वाजता घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी रितूचे वडिलाच्या तक्रारीवरून कोराडी पोलिसांनी पती, सासू, दोन ननंद यांच्यावर आत्मत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.

Story img Loader