नागपूर : शहरातील गँगस्टर सुमीत ठाकूरसह त्याच्या टोळीतील काही गुंडांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. यामुळे अनेक गुन्हेगार भूमिगत झाले आहेत. तर पोलिसांनी ठाकूर टोळीतील दोन सदस्यांची कारागृहात रवानगी केली आहे. सुमित ठाकूर हा अजूनही पोलिसांना गवसला नाही. सुमित ठाकूर हा कुख्यात गुन्हेगार असून त्याने काही पोलीस कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन गुन्हेगारी जगतात दहशत निर्माण केली आहे. तो अनेक क्रिकेट सट्टेबाजांच्या संपर्कात राहून पोलीस कर्मचाऱ्यांना जुगाराच्या नादाला लावत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकताच सुमित ठाकूरकडे सट्टेबाजीत दीड लाख रुपये लागवडी करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्तांनी निलंबित केले. पोलिसांच्या बळावर सुमितचा शहरात दरारा होता. सुमितच्या गुन्हेगारी कृत्यावर पोलीस ठाण्यातील कर्मचारी पडदा टाकून तक्रारदारांना ठाण्यातून पळवून लावत होते. गेल्या महिन्यात नाईक नावाच्या युवकाचे अपहरण करून लुटमार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्या युवकाला सुमितच्या टोळीतीस साथिदारांनी तक्रार मागे घेण्यासाठी धमकी दिली होती. तसेच सुमितने गिट्टीखदानमधील जुगार अड्डा संचालक गुही चाचेरकर याला ५० हजार रुपयांची खंडणी मागितली होती.

हेही वाचा : अंबाझरी तलावात उडी घेऊन कापड व्यावसायिकाची आत्महत्या

सुमितच्या टोळीचे वाढते प्रस्थ बघता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशाने सहायक पोलीस आयुक्त संतोष खांडेकर यांनी सुमित ठाकूर, उज्जी ऊर्फ उजेर, आबीद, धवन, अमित अण्णा यांच्यावर मोक्का कारवाई केली. उजेर आणि आबीदला अटक करून मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली.

हेही वाचा : नागपुरात दिवाळीच्या पूर्वसंध्येला हुंडाबळी

सुमित ठाकूरचा पोलिसांना गुंगारा

गुन्हेगारांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तरीही अनेक पोलीस कर्मचारी सुमित ठाकूरसारख्या गुन्हेगारांशी अर्थपूर्ण संबंध ठेवत आहेत. सध्या सुमित फरार असून त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पथकाची इत्यंभूत माहिती त्याला काही पोलीस कर्मचारी पोहचवितात. त्यामुळे तो पोलिसांना गुंगारा देण्यात नेहमी यशस्वी होत असल्याची चर्चा आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur mcoca on gangster sumit thakur and other criminals adk 83 css
Show comments