नागपूर : नांदेडमध्ये खासदार हेमंत पाटील यांनी अधिष्ठात्यांना चक्क स्वच्छतागृह साफ करायला लावले. या घटनेच्या निषेधार्थ येथील मेडिकल- मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्टर, पदवीचे विद्यार्थी, परिचारिका संघटनांनी एकत्र येत खासदार हेमंत पाटील यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.
नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) निवासी डॉक्टरांनी प्रथम त्यांच्या संस्थेतील अधिष्ठाता कार्यालय परिसरात एकत्र येत खासदारांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. खासदाराने अधिष्ठात्यांची माफी न मागितल्यास पुढच्या काळात संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला.
हेही वाचा : सकाळची रेल्वेगाडी धावते सायंकाळी! प्रवाशांचे बेहाल; समस्या सांगूनही लोकप्रतिनिधी घेईनात दखल
शासकीय रुग्णालयांमध्ये औषध व इतर पायाभूत सुविधांचा तुटवडा होण्यास शासनच कारणीभूत आहे. कर्मचाऱ्यांची आवश्यक पदेही भरण्यात आली नाही. त्यामुळे स्वच्छतेसह इतर कामे डॉक्टर वा इतर अधिकाऱ्यांनी रुग्णसेवा सोडून कशी करावी ? असा सवाल आंदोलकांनी केला. आंदोलनात निवासी डॉक्टरांची संघटना मार्ड, पदवीच्या विद्यार्थ्यांची असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंट्रन्स महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना सहभागी झाल्या होत्या.