नागपूर : नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत असलेल्या सर्व स्थानकांवर तसेच मेट्रो गाड्यांच्या आत स्वच्छता ठेवण्यास येथील कर्मचारी कटिबद्ध आहेत. एकीकडे स्थानके आणि गाड्यांअंतर्गत स्वच्छता ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मेट्रो कर्मचारी करीत असतानाच, मेट्रो खांबावर नेत्यांचे स्वागत फलक, पोस्टर लावण्याचे प्रयत्न अधिवेशन काळात केले जातात. त्यामुळे मेट्रोच्या खांबाचे विद्रुपीकरण होण्याची भीती असते. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे पोस्टर किवा जाहिराती त्यावर लावू नये, ही विनंती नागपूर मेट्रोने केली आहे.
हेही वाचा : मुख्यमंत्रीपदी कोण हे जास्त आमदार असलेला पक्ष ठरवेल; आमदार संजय गायकवाड म्हणाले, ‘बावनकुळेंची…’
मेट्रो खांबांचे (पिलर) विद्रुपीकरण झाल्यास भारतीय दंड सहिता १८६० च्या कलम २९४ तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ च्या कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. या कलमांतर्गत अश्या प्रकारे सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण करण्याऱ्या व्यक्तीला अटक होऊ शकते तसेच त्याच्याकडून दंड देखील आकाराला जाऊ शकतो. गाड्या आणि स्थानकांप्रमाणेच रस्त्यावरील खांब (पिलर) देखील स्वच्छ ठेण्यास नागपूर मेट्रोला सहकार्य करावे ही विनंती करण्यात येत आहे. शहरात सुचारू वाहतूक व्यवस्था देण्याचा महा मेट्रोचा मनोदय असून या प्रकल्पाला नागपूरकरांनी सर्वोतोपरी सहकार्य करावे असे आवाहन देखील या निमित्ताने केले जात आहे.