नागपूर : बारावीत असलेल्या विद्यार्थिनीचे वस्तीत राहणाऱ्या एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. बारावीची परीक्षा झाल्यावर त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. दोघांच्याही वारंवार भेटी-गाठी होत होत्या. त्यांच्या प्रेमसंबंधाची कुणकुण कुणालाही लागली नव्हती. सर्व सुरळीत सुरु असतानाच मुलीच्या ‘इंस्टाग्राम’वर प्रियकरासोबतचे बरेच व्हिडिओ तिच्या भावाला दिसले. त्याने आईवडिलांशी चर्चा केली आणि थेट पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सोनम (बदललेले नाव) ही आईवडिल आणि भावासह कपीलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. ती बारावीची विद्यार्थिनी आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी तिची आरोपी प्रतिकसोबत ओळख झाली. प्रतिकसुद्धा कपीलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो.

तो बी.ए. तृतीय वर्षाचा विद्यार्थी आहे. दोघांचेही कॉलेज एकाच रस्त्यावर असल्यामुळे दोघेही एकमेकांशी बोलत होते. दोघांमध्ये चांगली मैत्री होती. दोघेही एकमेकांना नेहमी मदत करायचे. प्रतिक हा शिक्षणासह एका खासगी कंपनीत कामाला जात होता. त्यामुळे तो तिला शिक्षणासाठीसुद्धा मदत करीत होता. दोघांच्या मैत्री पुढे वाढली. दोघांच्याही भेटी व्हायला लागल्या. त्याने फेब्रुवारी २०२४ मध्ये ‘व्हॅलेंटाईन डे’ला सोनमला प्रेमाची मागणी घातली. प्रतिकच्या प्रेमाला तिनेही साद दिली.

हेही वाचा : “शासकीय कर्मचाऱ्यांनाच साक्षीदार करा,” उच्च न्यायालयाने असा सल्ला का दिला?

दोघांचेही प्रेमसंबंध वाढले. मार्च महिन्यात त्याने सोनमला ‘सरप्राईज पार्टी’ असल्याचे सांगून फिरायला नेले. एका ढाब्यावर तिच्यासोबत जेवण केल्यानंतर तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, तिने स्पष्ट नकार दिला. त्यामुळे प्रतिकने तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर त्याने अनेकदा तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दोघांचे प्रेम चांगलेच फुलले.

भावाने व्हिडीओ बघितला

प्रतिक आणि सोनम हे दोघेही वस्तीपासून दूर जाऊन एकमेकांच्या भेटी घ्यायला लागले. सोनमसुद्धा प्रतिकच्या प्रेमात वेडी झाली. तिने प्रियकरासोबत बाहेर फिरायला गेल्यानंतर बरेच व्हिडिओ आणि फोटो काढले. गेल्या काही दिवसांपूर्वीच तिने प्रतिकसोबत एका बगिच्यात फिरत असलेला व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकला. त्यात प्रेमाचे गीतसुद्धा घातले. गेल्या दोन दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवरील व्हिडिओ तिच्या भावाने बघितला. त्याने बहिणीचे प्रेमप्रकरण आईवडिलांना सांगितले.

हेही वाचा : समृद्धी महामार्गावर अपघातांसह गुन्हेगारीतही वाढ; डिझेल चोरीसाठी महागड्या वाहनांचा वापर…

कुटुंबियांनी तिला विचारणा केली असता तिने प्रतिकसोबत प्रेम असून आम्ही लवकरच लग्न करणार असल्याचे सांगितले. तसेच शारीरिक संबंध ठेवल्याची कबुली दिली. त्यामुळे चिडलेल्या कुुटुंबीयांनी तिला कपीलनगर पोलीस ठाण्यात नेले. लेखी तक्रारीवरुन पोलिसांनी सोनमच्या प्रियकराविरुद्ध बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला. कपीलनगर पोलिसांनी कुटुंबियांच्या तक्रारीवरुन प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करुन अटक केली. प्रतिक शैलेंद्र वक्ते (२३, रा, कपीलनगर) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.

Story img Loader