नागपूर : पिपळा-बेसा रोडवरील अथर्व नगरीतील एका सदनिकेत राहणाऱ्या एका दाम्पत्याने घरी काम करण्यासाठी आणलेल्या ७ वर्षीय मुलीच्या छातीला आणि खासगी जागेवर सिगारेटचे चटके देऊन अनन्वित छळ केला.

चार दिवसांपूर्वी मुलीला घरात कोंडून दाम्पत्य बंगळुरूला निघून गेले. बुधवारी मुलीने खिडकीतून आवाज दिल्यामुळे ही घटना उघडकीस आली. मुलीला हुडकेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तूर्तास या प्रकरणाची तक्रार अद्याप नोंदवली नाही.

हेही वाचा – चक्क सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या घरी चोरीचा प्रयत्न

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिपळा फाटा-बेसा रोडवरील अथर्व नगरीतील एक सदनिका दुबईत राहणाऱ्या एका व्यक्तीच्या नावावर आहे. त्यामध्ये एक दाम्पत्य भाड्याने राहतात. त्यांनी ७ वर्षीय मुलगी काम करण्यासाठी पंजाब-हरियाणा येथून आणली आहे. त्या मुलीकडून दाम्पत्य घरातील सर्व कामे करून घेतात. तिला नेहमी मारहाण करीत होते. गेल्या चार दिवसांपूर्वी हे दाम्पत्य सदनिकेला कुलूप लावून बंगळुरूला निघून गेले. त्यांनी घरातील बाथरूममध्ये त्या मुलीला कोंडून ठेवले होते. तिला खायला काही ब्रेडचे पाकीट ठेवले होते. सदनिकेचे वीज बिल न भरल्यामुळे बुधवारी काही कर्मचारी वीज कनेक्शन कापायला आले. त्यांना खिडकीतून चिमुकली हात बाहेर काढून मदत मागत असल्याचे दिसले. कर्मचाऱ्यांनी शेजाऱ्यांना याबाबत माहिती दिली. शेजाऱ्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले आणि मुलीला बाहेर काढले.

जंगले नावाच्या दाम्पत्याने त्या मुलीला घरी नेले आणि जेवण दिले. तिची आंघोळ घालून दिली असता मुलीच्या छातीवर, पाठीवर आणि खासगी जागेवर सिगारेटचे चटके दिल्याच्या जखमा दिसल्या. मुलीला विचारणा केली असता ती खूप घाबरली होती. ‘मला कारमध्ये कोंबून येथे आणले. माझे आईवडील पंजाबमध्ये राहतात’ अशी माहिती त्या मुलीने दिली. याबाबत हुडकेश्वर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले आणि तिला मेडिकल रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी माहिती घेण्यासाठी हुडकेश्वरचे ठाणेदार जगवेंद्रसिंह राजपूत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

हेही वाचा – मेडिकल रुग्णालयात अनोखे रक्षाबंधन, चंद्रभागेत सापडलेल्या शंकरबाबांच्या मानस कन्येने बांधली डॉक्टरांना राखी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्या दाम्पत्याचा शोध सुरू

सदनिकेच्या मालकाशी पोलिसांनी संपर्क साधला. त्यांनी भाडेकरू दाम्पत्याशी चर्चा केली असता त्यांनी ते बंगळुरूला असल्याचे सांगितले. पोलिसांनी नेमका काय प्रकार घडला, याबाबत माहिती घेतली असून त्या भाडेकरू दाम्पत्याचा शोध सुरू केला आहे. तसेच ती मुलगी कुठली आहे? तिचे आईवडील कोण? तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला का? इत्यादीची चौकशी केली जात आहे.