नागपूर : प्रियकर-प्रेयसीने दोन वर्षे प्रेमसंबंध प्रस्थापित केल्यानंतर पळून जाऊन मंदिरात लग्न केले. दोघांच्याही कुटुंबियांनी लग्नाचा स्वीकार केला. सुखी संसार सुरू होता. तरुणी गर्भवती झाल्याने घरात पाळणा हलणार या आनंदात दोन्ही कुटुंब होते. मात्र, गर्भवती पत्नीचे वय १८ वर्षे पूर्ण व्हायला १० दिवस कमी होते. त्यामुळे पोलिसांनी कायद्यानुसार तिच्या पतीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक केली. निलेश (२३, पाचपावली) असे आरोपीचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश हा मोलमजुरी करतो. वस्तीत राहणाऱ्या निलिमा (काल्पनिक नाव) हिच्याशी सूत जुळले. दोघांचेही एकमेकांवर जीवपाड प्रेम जडले. दहावीत शिकणाऱ्या निलिमाने निलेशच्या प्रेमासाठी शिक्षण सोडून दिले. दोघांनीही दोन वर्षांनंतर लग्नाचा निर्णय घेतला. त्यावेळी निलिमाचे वय १८ वर्षे पूर्ण नव्हते. परंतु, दोघेही एकमेकांना सोडून राहू शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी २५ ऑगस्ट २०२२ ला घरून पळून जाऊन कोराडी मंदिरात एकमेकांच्या गळ्यात हार घालून लग्न केले. दोन महिने नागपुरात न राहता दुसरीकडे निघून गेले. दोघांच्याही कुटुंबियांनी त्यांना परत बोलावले. दोघेही पती-पत्नीने छोटाचा व्यवसाय थाटला. सुखी संसार सुरू होता. दरम्यान निलिमा गर्भवती झाली. घरात नवा पाहुणा येणार म्हणून त्यांनी नातेवाईकांना सांगितले. घरात आनंदी वातावरण होते. निलिमा आठ महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर निलेशने तिला मेयो रुग्णालयात तपासणीसाठी डॉक्टरांकडे आणले. डॉक्टरांनी तपासणी केली आणि प्रसुतीपूर्व प्रक्रिया सुरू केली. तिला आधारकार्ड मागितले असता तिला १८ वर्षे पूर्ण होण्यासाठी १० दिवस बाकी होते. त्यामुळे डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली. पाचपावली पोलिसांनी वैद्यकीय अहवालाच्या आधारे निलेशवर बलात्काराचा गुन्हा दाखल करीत अटक केली.

हेही वाचा – राज्यात विजेच्या मागणीत मोठी घट, मुंबईच्याही मागणीत निच्चांकी, कारण काय?

गर्भवती निलिमाचा आक्रोश

कुटुंबियांचा विरोध आणि आयुष्यात तडजोडी सहन करीत संसार करणाऱ्या निलिमाने पोलिसांना पती-पत्नी असल्याचे सांगितले. मात्र, काही दिवस वय कमी असल्यामुळे पोलिसांनी थेट गुन्हा दाखल करून पतीला अटक केली. त्यामुळे निलिमाने दवाखान्यातच आक्रोश केला. पोलिसांना वारंवार विनंती करीत बलात्कार झाल्याबाबत इन्कार केला. गर्भवती महिलेला पतीशिवाय आधार नसल्याचेही सांगितले. मात्र, पोलिसांनी लगेच अटक करून पोलीस कोठडीत डांबले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur minor wife pregnant rape case on husband adk 83 ssb