नागपूर : सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग विभागाचा संचालक असलेला प्रशांत पार्लेवार आणि गडचिरोली नगर रचना विभागात सहायक संचालक असलेली त्याची बहीण अर्चना पुट्टेवार यांनी सासरे पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्याकांडाचा कट रचल्याचे उघडकीस आल्याने प्रशांत पार्लेवारसह अर्चनाची सहायक पायल नागेश्वर यांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पत्रपरिषदेत दिली.
२२ मे रोजी मानेवाडा रोडकडून बालाजीनगरकडे जाणाऱ्या मार्गावर एका भरधाव कारने पुरुषोत्तम पुट्टेवार यांना धडक दिली होती. सुरुवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. तपासात हा अपघात नसून हत्या असल्याचे निष्पन्न झाले. या हत्याकांडाची मुख्य आरोपी व मृत पुरुषोत्तम यांची सून अर्चना पुट्टेवार हिच्यासह तिचा भाऊ प्रशांत पार्लेवार (५८) रा. उंटखाना रोड आणि अर्चनाची सहकारी आर्किटेक्ट पायल नागेश्वर (२५) या दोघांचीही या प्रकरणात महत्त्वाची भूमिका असल्याचे स्पष्ट झाले. अर्चना पुट्टेवार (५३) व तिचा सहकारी निरज निमजे, सचिन धार्मिक, सार्थक बागडे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली. यातील मुख्य आरोपी अर्चनाला कारागृहात पाठवण्यात आले आहे. आता नव्याने दोघांना अटक करण्यात आल्याने ज्या संपत्तीसाठी हा खून झाला ती एकूण संपत्ती किती याचा खुलासा होण्याचा शक्यता आहे. या पत्रकार परिषदेला सहपोलीस आयुक्त अश्वती दोरजे, अपर पोलीस आयुक्त संजय पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त निमित गोयल उपस्थित होते.
हेही वाचा: अकोला जिल्ह्यात वज्राघाताने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू
५० लाखांत ‘सुपारी’
अर्चना ही गडचिरोलीच्या नगररचना विभागात सहायक संचालक आहे. तिने सासऱ्याच्या हत्येची ५० लाखांत सुपारी दिली. जुनी कार विकत घेण्यासाठी सचिनला पैसे दिले. सचिन, सार्थक आणि निरजने घाटरोड येथून जुनी कार विकत घेतली. घटनेच्या वेळी अर्चना आरोपीच्या सतत संपर्कात होती तर सचिन हा शुभम हॉस्पिटल, मानेवाडा येथे होता. त्याने पुरुषोत्तम यांचा पाठलाग करून त्यांचे ठिकाण निरज आणि सार्थक यांना कळवले. निरज आणि सार्थक यांनी पुरुषोत्तम यांचा पाठलाग करत कारने धडक दिली. या अपघातात पुरुषोत्तम यांचा मृत्यू झाला. अर्चनाने आरोपींना रोख रक्कम आणि दागिने दिले होते. त्यापैकी तीन लाख रुपये, एक ४० ग्रॅमची सोन्याची बांगडी, शंभर ग्रॅमचे सोन्याचे बिस्कीट, असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
पैशांसाठी नात्यांना तिलांजलि
मृत पुरुषोत्तम पुट्टेवार यांना डॉ. मनीष, हेमंत आणि योगीता असे तीन अपत्य आहेत. तिघेही विवाहित आहेत. अर्चना ही मनीषची पत्नी आहे. अर्चना आणि प्रशांत हे बहीण-भाऊ आहेत. योगीताचे लग्न अर्चनाच्या भावासोबत झाले होते. मात्र, तिच्या पतीचे अपघातात निधन झाले. तेव्हापासून योगिता ही माहेरीच राहते. सासरच्या संपत्तीचा वाद न्यायालयात आहे. वडीलच तिच्या न्यायालयीन प्रकरणाचा पाठपुरावा करायचे. त्यामुळे अर्चना आणि प्रशांत यांच्यात तिसरा वाटा योगिताचा पडणार होता. त्यामुळे न्यायालयात पाठपुरावा करणाऱ्या सासऱ्याचा काटा काढण्यासाठी त्यांनी सुपारी दिल्याचे आयुक्त डॉ. सिंगल यांनी सांगितले.
हेही वाचा: विठ्ठल दर्शनाला जाण्यासाठी एसटीची विशेष सेवा, ५ हजार बसेस..
वडशात रचला हत्याकांडाचा कट
वडशातील एका वादग्रस्त तेल-कापड व्यापाऱ्याच्या घरी अर्चना पुट्टेवार-प्रशांत पार्लेवार यांची बैठक झाली. त्या बैठकीत सुपारी देऊन सासऱ्याचा खून करण्याचा कट रचण्यात आला. या व्यापाऱ्याला पूर्वी काँग्रेसच्या एका बड्या नेत्याचा आशीर्वाद होता. परंतु, करोनानंतर त्याने शिवसेनेची कास धरली. त्या व्यापाऱ्याचाही या हत्याकांडात काही सहभाग आहे का, याबाबतही पोलीस तपास करीत आहेत.