नागपूर: नागपुरातील महाल परिसरात दोन धार्मिक गटात उसळलेल्या दंगलीनंतर अद्यापही तणावाचे वातावरण आहे. नागपूर शहर पोलिसांकडून या भागात संचारबंदी लावण्यात आली आहे. दरम्यान शुक्रवारी (२१ मार्च २०२५) दंगलग्रस्त भागातील मशिदीमध्ये मोजक्याच नमाजींच्या उपस्थितीत नमाज अदा करण्यात आली. याप्रसंगी जबाबदार लोकांनी एक महत्वाचा निर्णय घेतला.

नागपुरातील दंगलग्रस्त भागातील मशिदीमध्ये मोजक्याच नमाजीच्या उपस्थितीत शुक्रवारी नमाजपठण झाले. . या भागात पोलिसांकडून लावलेली संचारबंदी पाहता विविध मशिद कमिटी आणि समाजातील जबाबदार लोकांनी महत्वाचा निर्णय घेत घरातूनच नमाज पठण करण्यासाठी आग्रह धरला. चिटणीस पार्क आणि शिवाजी चौक येथील मशिदीमध्ये फक्त चार ते पाच लोकच नमाज पठणासाठी आले. परिसरात लागलेली संचारबंदी आणि त्यामध्ये पाच पेक्षा जास्त लोकांच्या एका ठिकाणी गोळा होण्यावर लावण्यात आलेले प्रतिबंध पाहता मशीद कमिटी तसेच मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करण्यासाठी लोकांनी मशिदीत येऊ नये, असे आवाहन केले आहे. त्यामुळे चिटणीस पार्क येथील मशिदीत जिथे रमजान महिन्यातील शुक्रवारी किमान ४०० ते ५०० लोक नमाज पठण करण्यासाठी यायचे, त्या ठिकाणी आज फक्त पाचच लोक नमाज पठण करणार आहे.

मोमीनपुरा परिसरात कडेकोट बंदोबस्त

नागपुरातील मुस्लिम बहुल मोमीनपुरा परिसरातही शुक्रवारी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. मोमीनपुरा परिसर नागपुरातला मुस्लिम बहुल भाग असून तहसील पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या या भागात संचारबंदीमध्ये कुठलीही शिथिलता देण्यात आलेली नाही. शुक्रवारच्या दिवशी (२१ मार्च २०२५) मोमीनपुरा मधील जामा मशीदीत मोठ्या संख्येने लोक नमाज पठण करण्यासाठी येतील, अशी शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे.

स्थानिक तहसील पोलीस स्टेशनच्या पथकासह, राज्य राखीव पोलीस दल तसेच नागपूर पोलिसांचा दंगा नियंत्रण पथक या ठिकाणी तैनात आहे. नागपूर पोलिसांनी रमजानचा महिना आणि शुक्रवारचा दिवस लक्षात घेत नमाज पठण करण्यासाठी कुठलेही निर्बंध लावलेले नाही. फक्त नमाजींनी त्यांच्या घराजवळ असलेल्या मशिदीत नमाज पठण करण्यासाठी जावे लांबच्या मशिदीत जाऊ नये, अशी अपेक्षा प्रशासनाला आहे.

Story img Loader