नागपूर : निवडणुका जवळ आल्या की अनेक छोटे राजकीय पक्ष, संघटना सक्रिय होतात. निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त करतात. तशीच स्थिती सध्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने नागपुरात पाहायला मिळते. वि.दा. सावरकर आणि महात्मा गांधी यांचा मारेकरी नाथुराम गोडसे यांना आदर्श मानणाऱ्या ‘नाथुराम हिंदू महासभेने’ नागपूर मधून लोकसभेची निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. या महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप बाळासाहेब काळे हे स्वतः मैदानात उतरणार आहेत.
हेही वाचा : बुलढाणा : ७७ गावांत पाणी पेटले! राजकीय नेते कार्यक्रमात व्यस्त
काळे यांनी या संदर्भात एक पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात त्यांनी निवडणूक का लढतो हे स्पष्ट केले आहे. संदीप काळे म्हणतात ‘सावरकर यांनी आयुष्यभर देशासाठी कष्ट वेचले तर हिंदूंवरील अन्यायाविरुद्ध पेटून ऊठत बलीदान देणारे नाथुराम गोडसे यांची या देशात अवहेलना होत आहे. ती थांबवण्यासाठी व वरील दोन्ही राष्ट्रप्रेमींना मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी नाथुराम हिंदू महासभा कटिबद्ध आहे. यासाठी जनजागृती व जनसमर्थन मिळवण्यासाठी निवडणूक ही एक संधी आहे म्हणून मी नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरणार आहे’, असे काळे यांनी स्पष्ट केले आहे. काळे यांच्या पत्रात शेवटी “घर घर में नाथुराम, मन मन मे नाथुराम” ही ओळही नमुद आहे.