नागपूर : २०१४ मध्ये राज्यात फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप- सेना युतीचे सरकार आले. तेव्हापासून नागपूर अधिवेशन काळात येणारे सत्ताधारी पक्षाचे आमदार हेडगेवार स्मृती मंदिराला भेट देतात. हा कार्यक्रम यंदाही झाला. पण सत्ताधारी गटातील अजित पवार गटाचे आमदार तेथे गेले नाही. अजित पवार गटाच्या दांडीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या व शिंदे गटाच्या सर्व मंत्री व आमदारांनी रेशीमबागेत स्मृती मंदिर परिसरात येऊन आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार व त्यांचा गट अनुपस्थित होता. त्यांचे मंत्रीही आले नाही. स्मृती मंदिराला भेटीचे निमंत्रण भाजपच्या माध्यमातून शिंदे गटाचे आमदार व मंत्री आणि महायुतीमध्ये सहभागी झालेल्या अजित पवार गटालाही देण्यात आले होते. त्यामुळे राज्यात फडणवीस आणि शिंदे गटासोबत अजित पवार गट सहभागी झाल्यानंतर ते आणि त्यांचा गटही स्मृती मंदिर परिसरात येणे अपेक्षित होते.

हेही वाचा : दुग्ध उत्पादनाच्या विकासावर भर, अकोला जिल्ह्यासाठी ४७१६ कोटींचा ‘पीएलपी’ आराखडा

भाजपचे आमदार आणि शिंदे गटाचे केवळ चार आमदार परिसरात उपस्थित झाले मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या गटाचे एकही आमदार स्मृती मंदिर परिसराकडे फिरकले नाही. या संदर्भात अजित पवार गटातील एका नेत्याशी संपर्क साधला असता त्यांनी निमंत्रण मिळाले हे मान्य केले. मात्र आम्ही शाहू – फुले आंबेडकर विचाराला मानणारे आहोत. त्यानुसार आम्ही आमची भूमिका घेतो. याबाबत भाजपला कळवण्यात आले आहे, असे स्पष्ट केले. भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, याबाबत मला माहिती नाही. आम्ही निमंत्रण दिले होते. मात्र ते का आले नाहीत याबाबत अजित पवारांशी बोला, असे सांगितले

हेही वाचा : डिसेंबर अखेरीस गारठा वाढणार… हवामान खात्याचा काय आहे अंदाज जाणून घ्या…

यावर्षी प्रथमच रेशीमबागेत सभागृहाच्या बाहेर हिरवळीवर मंत्री आणि आमदारांची व्यवस्था करण्यात आली. दरवर्षी संघाकडून विविध उपक्रमांची माहिती दिली जाते ती यावर्षी देण्यात आली. तसेच सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या विजयादशमीच्या भाषणाची प्रतही देण्यात आली.

Story img Loader