नागपूर : विदर्भातील विक्रमी संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून ५० हजार हेक्टर क्षेत्रावर संत्रा उत्पादन घेणाऱ्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे असलेल्या पाणंद रस्त्याची व त्याचेशी निगडीत असलेले जिल्ह्यातील अकुशल व कुशल स्वरूपाची कामे न करण्याचे आदेश ‘मनरेगा’च्या नागपूर विभागीय आयुक्तांनी निर्गमित केले आहेत. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासाला खिळ बसण्याची शक्यता अजित पवार गटाचे माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी वर्तवली आहे.
शेतकऱ्यांना शेतीची अवजारे आणि शेतीमाल ने-आण करणे सोयीचे व्हावे, त्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास व्हावा म्हणून तत्कालीन आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी विधानसभा मतदार संघामध्ये ११०० किलोमिटर पांदन रस्ते मंजूर करून आणल्यामुळे शेतीशिवारामधून मागील ४ वर्षांपासून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणांत पाणंद रस्ते निर्माण होतांना दिसत आहे.
शेतकऱ्यांना शेतीची अवजारे आणि शेतीमाल ने-आण करणे सोयीचे व्हावे, त्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास व्हावा म्हणून शेतकऱ्यांच्या संमतीने शेती शिवारामधून शासन ‘मनरेगा’च्या माध्यमातून मागील काही वर्षांपासून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणांत पाणंद रस्ते निर्माण करीत आहे. यातून रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे असलेल्या पाणंद रस्त्याची योजना बंद न करता ती अखंड सुरू ठेवणे गरजेचे असल्याचे मत माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केले.
शंभर दिवसांच्या कार्यक्रमात शेतरस्ता मोहीम सुरू असतांना दुसरीकडे मात्र ‘मनरेगा’च्या नागपूर विभागीय आयुक्तांच्या निर्देशाप्रमाणे रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पाणंद रस्ते व रस्त्याची निगडीत कोणत्याही स्वरूपाची अकुशल व कुशल कामे सुरू न करण्याचे आदेश निर्गमित केले आहे. जिल्ह्यातील यंत्रणेच्या सर्व प्रमुखांसह तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना पाठविलेल्या आदेशात उपजिल्हाधिकारी यांनी सदर आदेशापूर्वी पाणंद रस्ते व रस्त्याशी निगडीत कामावर वर्क कोड तयार केले असल्यास अशा कामांना स्थगिती देऊन कामे सुरू करण्यात येवू नये, असे स्पष्ट निर्देश दिल्यामुळे माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी मनरेगा आयुक्तांनी काढलेल्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे.