नागपूर : मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध ईडी आणि सीबीआयने कारवाई केली आणि देशमुख यांना तुरुंगात जावे लागले होते. १३ महिन्याचा तुरुंगावासानंतर त्यांची जामीनावर सुटका झाली आहे. आता तुरुंगवास उपमुख्यममंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप देशमुख यांचा आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संयोजक प्रा. श्याम मानव यांनी दोन दिवसांपूर्वी या प्रकरणावर भाष्य केल्यानंतर पुन्हा देशमुख प्रकरणात फडणवीस चर्चेत आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचा आरोप केला होता. त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते. आणि अनिल देशमुख गृहमंत्री होते. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपातून मुक्तता हवी असेल आणि या प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणांकडून होणारी अटक टाळायची असेल तर तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे सुपुत्र व तत्कालीन मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते अनिल परब आणि तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील आरोपांच्या शपथपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दबाब टाकला होता, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता.

हेही वाचा : “तिसरी आघाडी नाही, तर शेतकरी, शेतमजूर कष्टकरी यांची आघाडी…” बच्चू कडू म्हणतात…

त्यावर प्रतिउत्तर देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत ते काय बोलले याच्या ‘क्लिप्स’ माझ्याकडे आहेत. नाईलाजास्तव त्या बाहेर काढाव्या लागतील, असा इशारा दिला होता. अनिल देशमुख यांनी आज पुन्हा फडणवीस यांना खुले आव्हान दिले आहे. तीन वर्षांपूर्वी फडणवीस यांनी पाठवलेला एक खास माणूस माझ्या शासकीय निवासस्थानी चार शपथपत्रे घेऊन आला होता.

पहिल्या शपथपत्रात उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठी माझ्याकडे पैसे मागितले, असे नमुद होते. दुसऱ्या शपथपत्रात आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालीयन प्रकरणी गंभीर आरोप होते. तिसऱ्या प्रतिज्ञापत्रात अनिल परब यांच्यावरील आरोप होते तर चौथ्या प्रतिज्ञापत्रात अजित पवार यांनी मला गुटखा व्यावसायिकांकडून वसुली करण्यास सांगितले, असे नमुद होते.

हेही वाचा : भाषेमुळे घोळ अन् संसाराचा बट्ट्याबोळ! ‘भरोसा’मुळे सुटली नात्यातील गुंतागुंत…

या चारही प्रतिज्ञापत्रांवर मी स्वाक्षरी करावी व तसा जबाब तपास यंत्रणांसमोर द्यावा, या बदल्यात परमबीर सिंग यांच्या आरोप प्रकरणातून सुटका होईल, असे संबंधित व्यक्तीने मला सांगितले होते. या घटनाक्रमाचा पुरावा ‘पेन ड्राईव्ह’मध्ये माझ्याकडे आहे. मी पुराव्याशिवाय बोलत नाही. फडणवीस यांच्याकडे अशा कोणत्याही क्लिप्स नाहीत. मला माहिती आहे. पण, ते त्यांच्यावरील आरोपाचा लंगडा बचाव करण्यासाठी असे काहीतरी सांगत आहे. तरी देखील त्यांच्याकडे क्लिप्स असतील तर त्यांनी जनतेसमोर आणाव्यात. माझे त्यांना जाहीर आव्हान आहे.

विरोधकांना धमकावण्यासाठी गृहमंत्रीपदाचा वापर – पटोले

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या आरोपावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे काही ऑडिओ व्हिडिओ क्लिप असतील तर त्यांनी कारवाई केली पाहिजे, त्यांना अडवले कोणी. निवडणुकीच्या तोंडावर वादग्रस्त विधाने करून काय उपयोग. राज्याची कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे, राज्य़ात ड्रग्ज आणून तरूणपिढी बरबाद केली जात आहे, ड्रग्ज माफियांना ससूनमध्ये व जेलमध्ये फाईव्ह स्टार सुविधा दिल्या जात आहेत, त्यावर काही बोलत नाहीत. गृहमंत्रीपदाचा उपयोग काय फक्त विरोधकांना धमकवण्यासाठी करत आहात काय, असा सवाल काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते नागपूर येथे पत्रकारांशी बोलत होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur ncp leader anil deshmukh gives open challenge to devendra fadnavis said he have all proofs in pen drive rbt 74 css
Show comments