नागपूर : महाराष्ट्रातील हिऱ्यासह मोठमोठे उद्योग गुजरातला हलवले जात आहे. त्यानंतरही हे सरकार झोपेत आहे. सध्याची स्थिती पाहता राज्य सरकार गुजरातच्या दावणीला बांधलेले दिसतेय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार सोमवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. दरम्यान त्यांनी परिधान केलेले शिक्षक भरतीचा मुद्दा मांडणारे जॅकेट सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
मुंबईत हिऱ्याचा व्यवसाय दीड लाख कोटींहून अधिकचा आहे. हा व्यवसाय सांभाळून ठेवण्यासाठी सरकारने प्रयत्न करण्याची गरज आहे. परंतु, गुजरात सरकार हा उद्योग अहमदाबादला घेऊन जाण्याचा घाट रचत आहे. गुजरातचे व्यापारी सातत्याने मुंबईतील हिऱ्यांच्या मोठ्या व्यापाऱ्यांशी संपर्कात आहेत. महाराष्ट्रातील उद्योग तिथे हलविण्यासाठी विविध प्रकारची आमिषे देण्यात येत आहेत. परंतु, राज्यातील नेते दिल्लीला मुख्यमंत्रीसह विविध पदे मागण्यात मश्गुल आहेत. उद्योग खाते झोपलेले आहे. हिरे व्यवसाय राज्यातून गुजरातला गेल्यास सुमारे दोन लाख लोकांचा रोजगार जाणार आहे. त्यामुळे सध्याची स्थिती पाहता राज्यातील भाजप सरकार गुजरातसाठी काम करतेय का, असा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला.
हेही वाचा : एनआयएची अचलपुरात छापेमारी, युवकाची चौकशी; कारवाईबाबत कमालीची गुप्तता…
६० हजार शिक्षक भरती करा
नको पोकळ्या घोषणा ६० हजार शिक्षक भरती करा, समूह शाळा दत्तक शाळा म्हणजे सरकारच्या पोकळ खेळ, गरीब विद्यार्थ्यांवर कशाला आणताय वाईट वेळ असा मजकूर लिहीलेले जॅकेट घालून आमदार रोहित पवार सोमवारी विधानभवनात आलेत. जॅकेटच्या माध्यमातून शिक्षक भरतीचा मुद्याकडे रोहित पवारांनी लक्ष वेधले आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गेल्या दोन अधिशनामध्ये शब्द दिला. पण, प्रत्यक्षात भरती झालेली नाही, असा दावा पवार यांनी केला. यावेळी त्यांनी समूह शाळेचा मुद्दादेखील मांडला.