नागपूर : देशभरात मोदी सरकारने केलेल्या विकास कामांवर न बोलता केवळ राज्य व केंद्र सरकारवर, नेत्यांवर टीका करणे एवढेच काम विरोधी पक्षाकडे आहे. जो झोपला आहे त्याला जागा करता येते पण जो झोपेचे सोंग करत आहे त्याला जागा करता येत नाही, अशी टीका विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली. गोऱ्हे रविवारी नागपुरात आल्या असता त्या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या. लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणात त्यांनी दहा वर्षाचा विकास कामांचा आढावा घेतला. अनेक मोठे निर्णय घेतले मात्र विरोधी पक्षाकडून केवळ टीका केली जात आहे. झोपेचे सोंग घेऊन असणाऱ्या नेत्यांना जागा करता येणे शक्य नाही. संसदेत मोदींच्या भाषणावर विचार करण्याऐवजी केवळ राजकीय द्वेषातून विरोधी पक्षातील नेते टीका करत आहे. त्यांना आता ऐवढेच काम उरले आहे त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मोदींशिवाय पर्याय राहणार नाही. महाविकास आघाडीला उमेदवार मिळतील की नाही अशी त्यांच्या पक्षाची स्थिती झाली आहे.
हेही वाचा : गृहमंत्रालयाचे नकारात्मक धोरण मूळावर, पहिल्या महिला बटालियनची राज्याला अद्यापही प्रतीक्षा
त्या पुढे म्हणाल्या, संजय राऊत स्वत:च गुन्हेगार आहे. ते स्वत: गुन्हेगार म्हणून चौकशीसाठी तुरुंगात जाऊन आले आहे. ते कुठल्या स्वातंत्र्याच्या सत्याग्रहासाठी जेलमध्ये गेले नव्हते. त्यामुळे त्यांनी गुन्हेगारीवर बोलू नये. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात वाढलेली गुन्हेगारी होती ती कमी करण्याचा राज्य सरकारकडून प्रयत्न आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर होणारी टीका केवळ राजकीय द्वेषातून आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था राहण्यासाठी गृह विभाग सक्षम आहे. नेत्यांसोबतच गुंडासोबतचे असलेले संबंध नसल्याचे पुरावे नाही. बाजूला उभे राहून केवळ फोटो काढले जातात. अनेकदा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याना माहिती नसते. त्यामुळे कुठलाही पुरावा नसताना बेछुट आरोप करणे याकडे दुर्लक्ष करायला पाहिजे. आगामी लोकसभा निवडणुकीत जनतेच्या मनात काय हे लवकरच स्पष्ट होईल आणि मग पुढची वाक्य काय असेल तर ईव्हीएममुळे जिंकले किंवा हा धनशक्तीचा विजय आहे असे सांगत रडगाणे गातील अशी टीका त्यांनी केली.