नागपूर : शहराच्या दोन भागांना परस्परांशी जोडणारा दुवा अशी बर्डीवरील लोखंडी पुलाची ओळख आहे. त्याखालून जाणाऱ्या वाहनांची संख्या व त्यामुळे होणारी वाहन कोंडी लक्षात घेऊन मानस चौकात नवीन भुयारी मार्ग (आरयूबी) तयार करण्यात आला. परंतु, त्याचे नियोजन चुकल्यामुळे हा चौक मोठ्या वाहनांसाठी अडचणीचा ठरत आहे.
सीताबर्डी, झिरो माईल्स, धरमपेठ, अंबाझरी, धंतोली या भागात येण्यासाठी लोखंडी पुलाखालून यावे लागायचे. तसेच कॉटन मार्केट किंवा रेल्वेस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांसाठी हा पूल महत्त्वाचा होता. परंतु, वाढत्या वाहन संख्येमुळे वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागत होत्या. त्यामुळे मानस चौकासमोर-लोखंडी पुलाच्या बाजूलाच भुयारी मार्ग (रेल्वे अंडर ब्रीज) तयार करण्यात आला. मात्र, त्याचे नियोजन चुकले आणि हा चौक अपघात प्रवणस्थळ बनला. पुलाखालून जाण्यासाठी एकाच बाजूला दोन बोगदे तयार करण्यात आले. दोन्ही बोगद्यांची उंची खूप कमी आहे आणि वर रेल्वे रुळ असल्याने उंची वाढवता येत नाही. त्यामुळे जड वाहन किंवा बसेस त्याखालून काढणे मोठ्या जिकरीचे काम झाले आहे.
हेही वाचा…हंगामाच्या अखेरीस कापूस दरात सुधारणा, जाणून घ्या बाजार समितीतील भाव
मोठी वाहने पुलाच्या वरच्या बाजूला घासून जातात. तसेच पुलाखालून वाहन काढल्यानंतर बोगदा संपताच समोर कॉटन मार्केट चौकाचा सिग्नल आहे. त्यामुळे तेथे दिवसभर व रात्रीही गर्दी असते. बोगद्यातून बाहेर पडताच कोंडीत अडकावे लागते. कॉटन मार्केटकडे जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचा प्रयत्न सपशेल अपयशी ठरला आहे. बोगद्याच्या सुरुवातीलाच मानस चौकाच्या मधोमध संत तुलसीदास स्मारकाची नियोजित जागा आहे. हे स्मारक मधोमध असल्यामुळे वाहनांना गोल फिरून बोगद्यातून प्रवेश करावा लागतो. मोठ्या आकाराचे वाहन असल्यास कोंडी होते. तसेच दुर्गादेवीचे मंदिरही रस्त्यावरच आहे. मंदिरामुळे वळण रस्ता तयार करावा लागला आहे.
खासगी बसेसमुळे अडचणीत भर
मानस चौकातून रेल्वेस्थानक, मॉरिस टी पॉईंट, कॉटन मार्केट आणि सीताबर्डीकडे रस्ते जातात. त्याच चौकात उजव्या बाजूला ट्रॅव्हल्सचा थांबा आहे. या बस अगदी रस्त्यावरच तासनतास बस उभ्या असतात. प्रवासीसुद्धा तेथेच भरले आणि उतरवले जातात. यामुळे रस्ता अरुंद झाला असून अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.
हेही वाचा…गडचिरोली : धावत्या बसने पेट घेतला; चालक व वाहकाचे प्रसंगावधान, प्रवासी…
पावसाळ्यात पाणी साचणार?
भुयारी मार्ग अगदी तळघरासारखा आहे. पावसाळ्यात त्यात पावसाचे पाणी भरण्याची शक्यता आहे. पाण्यामुळे बोगदा तुडुंब भरल्यानंतर सीताबर्डी आणि कॉटन मार्केट या भागांचा संपर्क तुटू शकतो. बोगद्यात भरलेले पाणी बाहेर काढण्यासाठी जवळपास तीन ते चार दिवसांचा अवधी लागू शकतो.
नागरिक काय म्हणतात?
मानस चौकातील वाहतूक व्यवस्था बिघडलेली आहे. बोगद्यात वाहनांची मोठी गर्दी होत असल्यामुळे मानस चौकापर्यंत वाहतूक कोंडी होते. मध्ये एक खांब लावल्यामुळे अनेक वाहने यू-टर्न घेऊन परत जातात. त्यामुळे चौकात सतत वाहनकोंडी असते. – गणराज मंडपे, पानठेला चालक.
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीसाठी मनुष्यबळ, जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला ६७० कार्यालय-शाळांचा खो
रेल्वेस्थानकाकडून शनी मंदिर रस्त्याकडे जायचे असल्यास भुयारी मार्ग आणि देवी मंदिराजवळील रस्त्यामुळे संभ्रम निर्माण होतो. अनेकदा गरज नसतानाही या मार्गाचा वापर करावा लागतो. दुभाजक फोडून रस्ता तयार केल्यामुळे वाहनचालक संभ्रमात पडतात. येथील वाहतुकीचे नियोजन चुकल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. – आशीष ताकसांडे, कारचालक.
हेही वाचा…भंडारा : घरचा की बाहेरचा? भाजपच्या निरीक्षकांनी पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेतली मते, गोपनीय अहवाल…
वाहतूक पोलीस काय म्हणतात?
मानस चौक हा सर्वाधिक रहदारीचा चौक आहे. या भागात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलीस कर्मचारी नेहमी तैनात ठेवण्यात येतात. येथील वाहतुकीच्या कोंडीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. – जयेश भांडारकर, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग.