नागपूर: देशात मोठ्या संख्येने लोक रोजगारासाठी रांगेत उभे आहेत. तुम्ही भाग्यवान आहात, तुम्हाला नोकरीची संधी मिळाली, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. नागपुरातील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात केंद्र सरकारकडून आयोजित भारतीय रेल्वे आणि इतर केंद्र सरकारच्या विभागांतील १०४ नियुक्तीपत्र वाटपाच्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते.
हेही वाचा – अमरावती : कांद्याच्या दरात तीन दिवसांत दुपटीने वाढ; जाणून घ्या किरकोळ बाजारातील भाव…
हेही वाचा – चंद्रपूर जिल्ह्यात ५२ नवीन तलाठी कार्यालयांची निर्मिती होणार, १८ कोटींचा निधी मंजूर
याप्रसंगी मंचावर मध्य रेल्वे नागपूर मंडळाचे अप्पर रेल्वे व्यवस्थापक पी. एस. खैरकर, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे अप्पर रेल्वे व्यवस्थापक पी. चंद्रीकापूरे, रुपेष चांदेकर उपस्थित होते. गडकरी पुढे म्हणाले, केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने अर्थव्यवस्था बळकट करण्यासह रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करण्याचे प्रयत्न करत आहेत. तरुणांमध्ये नोकरीसाठी स्पर्धा वाढली आहे. या मेळाव्यात नोकरी मिळालेल्यांनी संधीचे सोने करत विविध विभागांत चांगल्या सेवा देण्याची गरज आहे. देशातील नागरिकांची सरकारी विभागात चांगल्या सेवा मिळण्याची अपेक्षा आहे. ती आपण पूर्ण करण्याची गरज आहे. सध्या आपल्याकडे आर्थिक कामाचे अंकेक्षण केले जाते. परंतु सरकारी कार्यालयातील कामाचेही अंकेक्षण आवश्यक असल्याचेही गडकरी म्हणाले.