लोकसत्ता टीम
नागपूर: केंद्रीय मंत्री व भाजप नेते नितीन गडकरी यांना महाराष्ट्रासह इतर राज्यातील मिळून सहा विद्यापीठांनी ‘डी लिट’ उपाधीने सन्मानित केले. पण ते त्यांच्या नावापुढे डॉक्टर लावत नाही. या मागचे कारण खुद्द गडकरी यांनीच नागपूरमध्ये एका कार्यक्रमा दरम्यान सांगितले.
‘ऑफ्रोट’ संघटनेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन शुक्रवारी गडकरी यांच्या हस्ते झाले. समाजाचा विकास आणि त्यासाठी आवश्यक असणारे शिक्षण या मुद्यावर बोलताना गडकरी म्हणाले, मला सहा विद्यापीठांनी डी लिट उपाधीने सन्मानित केले. त्यात पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, कृषी विद्यापीठ राहुरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगर, दयानंद आर्य विद्यापीठ नांदेड या चार महाराष्ट्रातील, एक चेन्नई आणि एक उत्तर भारतातील आहे. अनेक जण मला म्हणतात की तुम्ही नावापुढे डॉक्टर का लावत नाही. पण मला माहीत आहे की, मी किती विद्वान आहे. पहिले करावे, नंतर बोलावे, अशी माझी समाजकारणाची पध्दत आहे.
हेही वाचा… वर्धा: ‘या’ स्थानकांवर पुन्हा थांबणार रेल्वे; कोविड काळात होते बंद
गडकरी म्हणाले, आदिवासी समाजाच्या विकासासाठी आदिवासींसोबत गैर आदिवासींनी काम केले आणि करीत आहेत. समाजकारण करताना भावनिक मुद्दा पुढे करू नये, राजकीय पक्ष, नेते मतांसाठी हे करतात पण समाजाने ते टाळायला हवे.