नागपूर : नागपूरमधील प्रसिद्ध ॲथलेटिक प्रशिक्षक संजय (भाऊ) काणे यांचे रविवारी रात्री हृदयघाताने निधन झाले. दादाजी कोंडदेव पुरस्काराने सन्मानित भाऊ काणे यांचा सुमारे डझनभर आंतरराष्ट्रीय ॲथलिट घडविण्यात महत्वपूर्ण योगदान आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही काणे यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. नागपूर आणि विदर्भातील खेळाडूंना घडविणारे हाडाचे प्रशिक्षक भाऊ काणे यांच्या निधनाने क्रीडा क्षेत्रासाठी आयुष्य वेचणारा व्रतस्थ ऋषी गमावला आहे. भाऊंनी आपल्या कौशल्य,जिद्द आणि परिश्रमाने नागपूरमध्ये अकराहून अधिक आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविले. शहरात क्रीडा संस्कृती जोपासण्यासाठी भाऊ काणेंनी दिलेले योगदान नागपूरकर कधीही विसरू शकणार नाही, अशा शब्दात गडकरींनी काणेंना श्रद्धाजंली वाहिली.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही भाऊ काणे यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळाच्या माध्यमातून भाऊंनी नागपूर शहरात अनेक खेळाडू घडविले. त्यांनी घडविलेले खेळाडू राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर कर्तृत्व गाजवत आहेत. त्यांच्या निधनाने नागपूरच्या क्रीडा क्षेत्राची परिमित हानी झाली आहे.भाऊंसारख्या आधुनिक द्रोणाचार्यास भावपूर्ण श्रद्धांजली, असे बावनकुळे म्हणाले. नागपूर शहरातील क्रीडा,राजकीय क्षेत्रातील इतर मान्यवरांनीही भाऊ काणेंना आदरांजली वाहिली आहे. भाऊ काणे यांच्यावर सोमवारी दुपारी गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
हेही वाचा : जेव्हा सरकारी वकीलालाच करावा लागला सरकारचा विरोध, उच्च न्यायालयात घडला मजेदार प्रसंग…
कोण आहेत भाऊ काणे?
नागपूरमधील महाल परिसरात ७५ वर्षीय भाऊ काणे राहत होते. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य क्रीडा क्षेत्रासाठी अर्पण केले. १९७३ साली एम.कॉम मध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले. २००९ साली स्टेट बँक ऑफ इंडियामधून स्वैच्छिक सेवानिवृत्ती घेत त्यांनी खेळाडूंना पूर्णवेळ प्रशिक्षण द्यायला सुरूवात केली. नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळाच्या माध्यमातून त्यांनी खेळाडू घडविण्याचे कार्य केले. यासाठी १९९२-९३ साली दादाजी कोंडदेव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. २००८ साली त्यांनी नागपूरच्या बास्केटबॉल संघाला देखील प्रशिक्षण दिले. २०२० साली खासदार क्रीडा महोत्सवाच्या अंतर्गत त्यांना क्रीडा महर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. काणे यांच्या पश्चात दोन भाऊ,एक बहिण आणि मोठा आप्तपरिवार आहे. भाऊ मागील सहा महिन्यापासून आरोग्याच्या कारणामुळे मैदानावर येत नव्हते. त्यांनी सुमारे वयाची ४५ वर्षे क्रीडा क्षेत्राला अर्पण केली. त्यांच्या निधनाने शहरातील क्रीडाप्रेमींमध्ये शोककळा पसरली आहे.