नागपूर : जगाच्या काही देशांमध्ये करोनाचे रुग्ण वाढल्याने नागपूरसह भारतातही हा आजार वाढण्याचा धोका होता. सुरुवातीला रुग्णही वाढले. परंतु नवीन लाटेत सक्रिय करोनाग्रस्तांची नागपुरातील पन्नासवर गेलेली संख्या शनिवारी ३७ वर आल्याने करोना ओसरत असल्याचे संकेत आहेत. नागपुरातील प्रत्येक सक्रिय करोनाग्रस्तांचे नमुने जनुकीय चाचणीसाठी विविध प्रयोगशाळेत पाठवले जात आहेत. त्यापैकी अनेकांना जेएन १ उपप्रकाराचे संक्रमण झाल्याचे पुढे आले आहे. हा उपप्रकार खूप वेगाने पसरत असल्याचे जगातील काही देशातील रुग्णवाढीवरून पुढे आले होते. त्यामुळे महापालिका आणि जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात चिंता वाढली होती.

हेही वाचा : “जातनिहाय जनगणना करण्यास कटिबद्ध”, राहुल गांधी यांची ग्वाही; दिल्लीत ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक

परंतु प्रत्यक्षात नागपूर जिल्ह्यात आढळणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णवाढ फारशी नाही. त्यामुळे सक्रिय करोनाग्रस्तांची पन्नासावर गेलेली रुग्णसंख्या आता ओसरत असल्याचे चित्र आहे. शनिवारी शहरी भागात २३, ग्रामीणला १४ असे एकूण ३७ सक्रिय करोनाग्रस्त नोंदवले गेले. त्यापैकी गंभीर संवर्गातील ९ रुग्ण विविध रुग्णालयांत दाखल आहेत. त्यातील १ अत्यवस्थ तर ४ प्राणवायूवर असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालातून पुढे आली.

हेही वाचा : नागपूर : आरटीओ अधिकारी गोळीबार प्रकरण गुन्हे शाखेकडे; गायकवाड, शेजवळसह सगळ्यांचे जबाब नोंदवणार

जिल्ह्यात नवीन ४ रुग्णांची भर

दरम्यान, शहरात २४ तासांत १, ग्रामीणला ३ असे एकूण ४ नवीन करोनाग्रस्त आढळले. दिवसभरात शहरातील ७, ग्रामीणचा १ असे एकूण ८ रुग्ण करोनामुक्त झाले.

भारतात जेएन.१ चे एकूण १,२०० रुग्ण

भारतामध्ये १४ जानेवारीपर्यंत कोविड-१९ चा उपप्रकार असलेल्या जेएन.१ चे एकूण १,२०० रुग्ण नोंदवण्यात आले आहे. देशातील १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. ‘इन्साकॉग’ या संस्थेच्या आकडेवारीनुसार जेएन.१ चे कर्नाटकात सर्वाधिक म्हणजे २१५ रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ आंध्र प्रदेशात १८९, महाराष्ट्रात १७० तर केरळमध्ये १५४ रुग्णसंख्या आहे. पश्चिम बंगाल, गोवा, तमिळनाडू आणि गुजरातमध्येही जेएन.१ची लागण झालेल्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. तेलंगण, छत्तीसगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, ओडिशा, उत्तराखंड, नागालँड या राज्यांमध्येही जेएन.१चे रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड रुग्णांच्या वाढत्या संख्येवर सातत्याने आणि बारकाईने लक्ष ठेवायला सांगितले आहे. दुसरीकडे, देशभरात कोविड-१९ विषाणूचा संसर्ग झालेले नवीन ४४१ रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊन ती ३,२३८ इतकी झाली आहे.

Story img Loader