नागपूर : महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच ओबीसी समाजातील मुलांना वैमानिकाचे प्रशिक्षण देऊ इच्छिणाऱ्या महाज्योती आणि राज्य सरकारच्या कुचकामी धोरणामुळे प्रशिक्षणार्थी वैमानिकांना त्यांच्या भविष्याची चिंता सतावत आहे. या योजनेसाठी आतापर्यंत साडेसात कोटी रुपयांचा खर्च करूनही अनेकांना एका तासाचेही प्रशिक्षण मिळालेले नाही. त्यामुळे हे प्रशिक्षणार्थी मागच्या तीन दिवसांपासून नागपुरात उपोषणाला बसले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाज्योतीने राज्यातील ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गातील युवकांना वैमानिकाचे प्रशिक्षण देण्यासाठी योजना सुरू केली. त्यासाठी महाज्योती आणि नागपूर फ्लाईंग क्लब यांच्यात करार झाला. महाज्योतीने नागपूर फ्लाईंग क्लबला साडेसात कोटी रुपये दिले. या प्रशिक्षणासाठी इयत्ता १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात आले. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील २० युवकांची या प्रशिक्षणासाठी निवड झाली. १ नोव्हेंबर २०२२ ला प्रशिक्षण सुरू झाले. प्रशिक्षणाचा कालावधी १८ महिन्यांचा आहे आणि किमान २०० तास विमान उडवण्याचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. प्रशिक्षणाचा कालावधी ३० एप्रिल २०२४ ला संपला. पण, विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले नाही. काही विद्यार्थ्यांना तर एक तास देखील विमान उडवण्याचे प्रशिक्षण दिले गेले नाही.

हेही वाचा : संजय राठोड म्हणाले, “अपघात झालाय, मी सुखरूप; पण, घातपात असण्याची शक्यता”

दोन वर्षांच्या कालावधीत विद्यार्थ्यांना नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) व्यावसायिक पायलट परवाना (सीपीएल) परीक्षांसाठी योग्य आणि पूर्ण ग्राऊंड क्लासेस मिळाले नाहीत. महाज्योती आणि नागपूर फ्लाईंग क्लब यांच्या गलथान कारभारामुळे असे घडले, असा आरोप प्रशिक्षणार्थींनी केला आहे. शिवाय त्यांचे महत्त्वाचे दोन वर्ष देखील वाया गेले आहेत. पूर्ण प्रशिक्षण द्या म्हणून सातत्याने पाठपुरावा करूनही शासनाने दखल न घेतल्याने या प्रशिक्षणार्थींनी उपोषण सुरू केले आहे. नागपूर फ्लाईंग क्लब व्यतिरिक्त इतर प्रतिष्ठित संस्थेतून प्रशिक्षण देण्यात यावे, महाज्योतीचा वैमानिक प्रशिक्षण हा उपक्रम १०० टक्के प्रायोजित आहे. तरी देखील फ्लाईंग क्लबने प्रशिक्षणार्थींना शुल्क आकारले आहे. ती रक्कम परत मिळावी आणि प्रशिक्षणाला विलंब झाल्याने विद्यावेतन देण्यात यावे, अशी या प्रशिक्षणार्थींची मागणी आहे.

हेही वाचा : वरती मेट्रो, खाली रेल्वे, मध्ये रस्ता अन् आणखी बरेच काही…देशातील पहिला उड्डाणपूल

तीन विद्यार्थ्यांना शून्य तास प्रशिक्षण

गेल्या २३ महिन्यात तीन प्रशिक्षणार्थींना शून्य, एका प्रशिक्षणार्थीला एक तास, एकाला तीन तास उड्डाणाचे प्रशिक्षण देण्यात आले. सर्वाधिक ३५ तासांचे प्रशिक्षण एकाच प्रशिक्षणार्थीला मिळाले.

नागपूर फ्लाईंग क्लबच्या अधिकाऱ्यांशी गुरुवारी सकाळी बैठक झाली. प्रशिक्षण पूर्ण करावे. काही अडचण असल्यास कळवावे. जेणेकरून वेगळ्या फ्लाईंग क्लबमार्फत प्रशिक्षण दिले जाऊ शकेल, अशी भूमिका आम्ही मांडली. क्बलच्या अधिकाऱ्यांनी ९ ऑक्टोबरपासून प्रशिक्षण सुरू करत असल्याचे सांगितले आहे.

राजेश खवले, व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur obc students strike as they did not get pilot training from mahajyoti and nagpur flying club rbt 74 css