नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३, मधील लिपिक टंकलेखक व करसहायक या संवर्गाची ‘टंकलेखन कौशल्य चाचणी’ परीक्षेत पहिल्याच दिवशी तांत्रिक गोंधळ उडाल्याने १ ते ३ जुलैपर्यंतची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर सुरू झालेल्या परीक्षांमध्ये रोज नवनव्या अडचणी येत आहेत.
टंकलेखनासाठी देण्यात आलेले ‘कीबोर्ड’ हे जुने किंवा नादुरुस्त असल्याने विद्यार्थ्यांना निर्धारित कालावधीमध्ये टंकलेखन करणे कठिण होत असल्याने प्रचंड नुकसान होत आहे. विशेष म्हणजे ‘एमपीएससी’च्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत पात्रता गुणांहून अधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवारांचे ‘किबोर्ड’च्या तांत्रिक गोंधळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. यासंदर्भात आयोगाला निवेदन देऊनही दुर्लक्ष केले जात असल्याचा उमेदवारांचा आरोप आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन न्यायाची अपेक्षा केली जात आहे.
विद्यार्थ्यांच्या निवेदनानुसार, याआधी १ ते ३ जुलै रोजीच्या टंकलेखन कौशल्य चाचणी तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलली होती. त्यानंतर परीक्षा ४ जुलैपासून सुरू झाली. परंतु त्यादिवशीदेखील ‘किबोर्ड’ची तांत्रिक अडचण दूर झालेली नसल्यामुळे अनेक उमेदवारांना अडचणीस सामोरे जावे लागले. त्यानंतर ‘किबोर्ड’च्या अडचणी लक्षात आल्यावर परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीने लगेच दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच ५ जुलैपासून ते ९ जुलैपर्यंत परिक्षाकेंद्रावर नवीन ‘कीबोर्ड’ देण्याची व्यवस्था केली. पण, त्यानंतर नवीन ‘किबोर्ड’ हे १० ते १३ जुलै रोजी परीक्षा केंद्रांवर केवळ तिसऱ्या माळ्यावरील मराठी टंकलेखनाच्या उमेदवारांना देण्यात आले. त्याच दिवशी चौथ्या माळ्यावर असणाऱ्या इंग्रजी टंकलेखन उमेदवारांना ‘ॲसर’चे जुने ‘किबोर्ड’ देण्यात आले. यातील बरेच ‘किबोर्ड’ व्यवस्थित कार्य करीत नसल्याुळे विद्यार्थ्यांनी बदलून देण्याची विनंती केली. पण आयोगाद्वारे नेमणूक करण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले.
त्यामुळे खूप उमेदवारांच्या उताऱ्यांचे टंकखेलन अपेक्षित कालावधीत पूर्ण होऊ शकले नाही. आमच्यावर झालेल्या अन्यायाबाबत आम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य कार्यालयात देखील तक्रारी दाखल केली. परंतु, आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांनी आम्हास कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही. अनेक वर्षांपासून टंकलेखन परिक्षेची तयारी करणाऱ्यांवर हा अन्याय झाल्याने त्यांचे भविष्य अंधारमय झाले आहे. शासनाने टंकलेखन कौशल्य चाचणी परत घेऊन न्याय मिळवून द्यावा अशी विनंती करण्यात आली आहे.
हेही वाचा : अमरावती: शहर बसने चिमुकल्याला चिरडले, संतप्त जमावाकडून तोडफोड…
या आहेत अडचणी
महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-क लिपिक पदाची पवई, मुंबई येथील परीक्षा केंद्रावर १० आणि ११ जुलै रोजी इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी देत असताना ‘कीबोर्ड’मध्ये अडचणी आल्या. ‘किबोर्ड’मधील ‘बॅकस्पेस’, ‘शिफ्ट’ बटन आणि अन्य बटनांमध्ये टंकखेलन करताना अडचणी येत होत्या. अनेकदा ‘स्पेस’ बटन पुढे जात नव्हती तर कधी बटन दबत नव्हती. विद्यार्थ्यांनी आयोगाच्या नियमावलीनुसार परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ‘कीबोर्ड’ बदलून देण्याची विनंती केली. परंतु त्यांनी ते ‘कीबोर्ड’ बदलवून दिले नाहीत. तसेच वारंवार विनंती करूनही ‘कीबोर्ड’च्या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत एमपीएससीच्या कार्यालयात दाद मागण्यास सांगितले. त्यामुळे ‘कीबोर्ड’च्या खराब बटणांमुळे निर्धारीत वेळत टंकलेखन कौशल्य चाचणी पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे पूर्व व मुख्य परीक्षेत पात्रता गुणांपेक्षा अधिक गुण असूनही केवळ ‘किबोर्ड’ व्यवस्थित नसल्यामुळे टंकलेखन परीक्षेत मोठे नुकसान झाले आहे.