नागपूर : विदर्भाच्या प्रश्नावर विधान परिषदेत चर्चा झाली. सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी सरकारने केलेल्या कामांचा पाढा वाचला. हा प्रस्ताव सरकारकडून मांडण्यात आला. मात्र अशाच प्रकारचा प्रस्ताव विरोधी पक्षांकडून देण्यात आला व. मात्र तो फेटाळला गेला. त्याचे पडसाद सभागृहांत उमटले. विदर्भात अधिवेशन होऊनही या भागातील प्रश्नांवर चर्चा होत नाही, अशी टीका होत आहे. अपेक्षेप्रमाणे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विदर्भावर चर्चा ठेवण्यात आली. विरोधकांचा या मुद्यावरील प्रस्ताव फेटाळून सत्ताधाऱ्यांनी दिलेला प्रस्ताव स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी कुरघोडी केली.
हेही वाचा : वर्धा : वैद्यकीय महाविद्यालयासाठी आता आर्वीकर सरसावले, गुंता वाढला
या प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वरील बाबींवरून सत्ताधारी पक्षाला लक्ष्य केले. ते म्हणाले ” तुम्ही सत्तेत आहात, विरोधकांचा प्रस्ताव स्वीकारायला हवा होता. पण तसे झाले नाही. इतके वर्ष तुम्हीच सतेत होता, विदर्भासाठी काय केले? सत्ताधारी पक्षाचे सदस्यच विविध विभागांतील भ्रष्टाचार सभागृहात मांडतात. नागपुरात गुन्हेगारी वाढली, तरूण व्यसनाधीन होत आहे. आणि वरून तुम्हीच प्रस्ताव मांडणार, चर्चाही तुम्हीच करणार, मंत्र्यांनी काय केले याचे पाढे वाचले जात आहे, मग विदर्भाची अशी अवस्था का?”, असा प्रश्न दानवेंनी उपस्थित केला.